आजपासून वणीत प्रशासनातर्फे घरोघरी आरोग्य सर्वेक्षण

ऑक्सिमीटर व थर्मलस्कॅनरने होणार तपासणी

0

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग बघता प्रशासनातर्फ रविवार पासून आरोग्य सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. हे सर्वेक्षण 19 जुलै ते 24 जुलै पर्यंत चालणार आहे. या कामासाठी 52 पथक तयार करण्यात आले असून या प्रत्येक पथकात 2 जणांचा समावेश आहे. एका प्रभागात 4 पथक आरोग्य सर्वेक्षणासाठी राहणार आहे. पथकात नगर पालिका व जिल्हा परिषद शिक्षक यांचा समावेश आहे.

हे 52 पथक शहरातील 18 हजार घरांचा सर्वे करणार आहे. या पथकाकडे ऑक्सिमीटर व थर्मलस्कॅनर दिले जाणार असून या मशिनद्वारे नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या सर्वेक्षणाबाबत शनिवारी वणीतील कल्याण मंडपम येथे ट्रेनिंग देण्यात आले.

कुणीही खोटी माहिती देऊ नये – डॉ. जावळे
जो पर्यंत कोरोना शहरातून समुळ नष्ट होत नाही तोपर्यंत हा सर्वे दर महिन्याला होणार आहे. जे व्यक्ती सर्वेक्षणासाठी घरी येईल त्यांच्यापासून आजारासंबंधी कोणतीही माहिती लपवू नये. जर योग्य माहिती दिली. तरच प्रशासनाला त्यानुसार पुढची आखणी करता येईल. हा सर्वे वणीकरांच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे वणीकरांनी प्रशासनास सहकार्य करावे.
– डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी वणी

‘वणी बहुगुणी’ इम्पॅक्ट

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्राध्यापक, जिल्हा परिषद शिक्षक, शिकतेत्तर कर्मचारी इ. यांची मदत घ्यावी अशी सूचना केली होती. अखेर प्रशासनाने जिल्हा परिषद शिक्षकांचा उपयोग सर्वेक्षणासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेकपोस्टवर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची नोंदणी केली जाते. मात्र त्या व्यक्तींनी कोविड केअर सेन्टरमध्ये भेट दिली का? याबाबत कोणतीही पडताळणी कोविड केअर सेन्टरमध्ये केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाने या सूचनेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.