सुशील ओझा, झरी: तालुक्यतील मुकूटबन येथील बालाजी जिनिंगला आग लागून त्यात 400 ते 500 क्विंटल कापूस जळून खाक झाला. आज मंगळवारी 9 जून रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मुकूटबन येथे खासगी व सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. परंतु खासगी कापसाला आग न लागता शासकीय खरेदी केलेल्या कापसाच्या गंजीला आग लागल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मुकुटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये महिला खराब कापूस वेचण्याचे काम करीत होत्या. त्यांना दोन गंजीला आग लागल्याचे दिसले. त्यावेळेस जोरदार हवा सुरू असल्याने आगीने रुद्र रूप धारण केले. जिनिंगला आग लागल्याची माहिती मिळताच ठाणेदार धर्मा सोनुने व वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासह जमादार अशोक नैताम, नीरज पातूरकर, प्रदीप कवरासे, स्वप्नील बेलखेडे हे देखील घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासाठी आरसीसीपीएल कंपनी व वणी नगर परिषद मधील अग्निशमन दलाची गाडी बोलावण्यात आली. गाडी आल्यानंतर काही काळातच आग विझवण्यात आली.
परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण
मुकूटबन येथील बालाजी व वसंत जिनिग मध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. या करिता शासकीय ग्रेडरची नियुक्ती करण्याता आली होती. परंतु शासकीय ग्रेडरने दोन तरुण असिस्टंटची म्हणून नेमणूक केली होती. त्यांच्यावर चांगल्या कापसाला खराब म्हणून रद्द करण्याचा तसेच खराब कापसाला चांगला म्हणून 5 हजार ते 5 हजार 300 रुपये पर्यंत भाव देत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला होता. याबाबत शेतकऱ्यांचे अनेकदा ग्रेडरसोबत वाद झाले होते शिवाय चक्काजाम सुद्धा करण्यात आले होते.
कापूस खरेदी केंद्रावर बाजार समितीचे कोणताही वचक नसल्याने दलाल व ग्रेडर यांचे चांगलेच फावत होते. दलालांचे खराब (कवडी) कापूस पैसे घेऊन ग्रेडर जास्त भाव लावत होते. या बाबत संचालक सुनील ढाले यांनी सुद्धा आरोप लावले होते. दलाल लोकांचा शेकडो क्विंटल खराब कापूस खरेदी शासनाचा नुकसान काही दलाल व ग्रेडर यांनी केल्याची ओरड शेतकरी करीत आहे. हे नुकसान भरून काढण्याकरिता खराब (कवडी) असलेला कापूस जाळला की जळाला अशी शंका व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….