मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर- शेलू (खुर्द) चा संपर्क तुटला

शेकडो एकर जमीन पुराखाली, शेतक-यांचे मोठे नुकसान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संततधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे रात्रीपासून नांदेपेरा पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेलू (खुर्द) गावाचा संपर्क तुटला आहे. गावाबाहेर जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग पुरामुळे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान या पुरामुळे शेकडो एकर पीक पाण्याआधी आले.  यामुळे शेतक-यांची मोठे नुकसान यात झाले आहे. दरम्यान पुराची माहिती मिळताच काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी आज शनिवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी पूरग्रस्त भागाचा दौरा केला.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांच्या पावसामुळे परिसरातील नदी, नाले दुथडी भरले आहेत. वर्धा नदी पात्राच्या पाण्यात देखील अचानक वाढ झाली. त्यामुळे याचा फटका नांदेपेरा, शेलू (खुर्द), रांगणा, भुरकी, गोवारी, कोलेरा, पिंपळगाव, जुनी उकणी, निलजई, बेलोरा इत्यादी गावांना बसला आहे. या गावातील शेतजमीन पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. तर पूर आल्याने शेलू गावाचा संपर्क शुक्रवार रात्रीपासून तुटला. सुमारे पाचशे ते सहाशे एकर जमीन पुराच्या पाण्याखाली आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

संजय खाडे यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा
पुराची माहिती मिळताच संजय खाडे यांनी सहका-यांसह नांदेपेरा व परिसरातील गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतीची पाहणी करीत गावातील शेतक-यांशी संवाद साधला. शेतक-यांचे नुकसान पाहता त्यांनी वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. दौ-यात प्रशांत गोहोकार, प्रमोद वसेकर, पुरुषोत्तम आवारी, राजीव अंकितवार अशोक चिकटे, तेजराज बोडे इत्यादींची उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.