शहीद जवानाच्या आई-वडिलांना दिला ध्वजारोहणाचा मान

जितेंद्र कोठारी, वणी: देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर शहीदाला श्रद्धांजली व सन्मान देण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम वणी पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी राबविण्यात आला. सर्व शासकिय विभागासह पोलीस ठाण्यात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणेदार यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात येते. मात्र ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या संकल्पनेतून देशाची सुरक्षा करताना वीरगती प्राप्त झालेले शहीद ले. कर्नल वासुदेव आवारी यांचे आईवडिलांना यावर्षी महाराष्ट्र दिवस व कामगार दिनानिमित्त धवजारोहण करण्याचा मान देण्यात आला.

ध्वजारोहणसाठी शहीद पिता डॉ. दामोदरराव आवारी व शहीद माता विजया आवारी यांना ससन्मान पोलीस स्टेशन आणण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस वाहन त्यांच्या घरी पाठविण्यात आले. त्यानंतर ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रदीप शिरास्कर, सहा. पोलीस निरीक्षक माया चाटसे, सहा.पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शहीद पिता डॉ. दामोदरराव आवारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

वणी येथील वीर सुपुत्र लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांना भारत चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्यावर असताना 4 ऑक्टो. 2022 रोजी वीरगती मिळाली होती. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी वणी व परिसरातील हजारो नागरिकांनी भर पावसात एकच गर्दी केली होती.

Comments are closed.