लॉकडाऊनमध्ये रेती तस्कर तेलंगणात फरार झालाच कसा?

वणीत चर्चेला उधाण, प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

0

वणी बहुगुणी डेस्क: वणी महसूल विभागातील गणेशपूरचे मंडळ अधिकारी व तलाठी यास धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रेती तस्कर उमेश पोद्दार विरुद्द वणी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद होउन सहा दिवस झाले. मात्र या फरार आरोपीला अटक करण्यास पोलिसांना अद्याप यश आले नाही. पोलीस प्रशासनाद्वारे आरोपी तेलंगणात असल्याची माहिती प्रसार माध्यमाना देण्यात आली होती. मात्र त्यामुळे आता शहरात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असताना तसेच जिल्ह्याच्या सीमा पार करणे अशक्य असताना आरोपी राज्याची सीमा पार करून दुस-या राज्यात गेलाच कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तलाठी व मंडळ अधिका-यांना धक्काबुक्की करणे हे प्रकऱण आधीपासूनच शहरात चर्चेला विषय ठरले आहे. या प्रकऱणात प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रेती भरलेलं ट्रक पकडल्यानंतर तस्कर उमेश पोद्दार यांनी मंडळ अधिकारी देशपांडे यांना तुम्ही तहसीलदाराला फोन लावा, ते तुम्हाला रेती सोडण्याचा आदेश देतील असे सांगितले होते. मात्र मंडळ अधिकारी देशपांडे यांनी तहसीलदार यांना माहिती न देता सरळ उपविभागीय अधिकारी यांना फोन लावून घटनेची माहिती दिली. त्यामुळे हे प्रकरण सुरूवातीपासूनच चर्चेत होते.

आरोपी परराज्यात गेलाच कसा?
परजिल्ह्यात जायचे असल्यास किंवा राज्याची सीमा पार करायची असल्यास प्रशासनातील सक्षम अधिका-यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. जर रेती तस्कर आरोपी उमेश पोद्दार परराज्यात गेला असेल तर त्याला प्रशासनाने परवानगी दिली का? आरोपी जामिनासाठी प्रयत्न करतोय त्यामुळे आरोपीला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस तर मदत करत नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. यासह आरोपी वणीतच वावरत असतानाची माहिती अनेकांना मिळाली. तसेच आरोपी सोशल मीडियात ऑनलाईन दिसत असताना पोलिसांनी आरोपी फरार असल्याचा बनाव तर केला नाही असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महसूलच्या एका अधिका-याचा डबलगेम
एखादा कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यावर ‘हात’ उगारणे ही अतिशय गंभीर आणि धक्कादायक बाब आहे. यात वरिष्ठ अधिका-यांचा ‘हात’ असल्याशिवाय हे शक्यच नाही. या प्रकरणाविषयी मीडियात बातम्या येताच शहरात विविध चर्चेला उधाण आले. यात ‘रेती’ने हात माखलेला एक अधिकारी याचा संदर्भ देऊन खालच्या कर्मचा-यावर कार्यवाहीबाबत दबाव टाकत कर्तव्यदक्षतेचा फार्स करत आहे. तर दुसरीकडे तस्कराच्या ‘रेती’मध्ये आपल्या हितसंबंधांचे ‘सिमेंट’ मिसळून आपला आर्थिक ‘मसाला’ कालवत आहे. अधिका-यांच्या या डबलगेममुळे हाताखालच्या कर्मचा-यांवर ना ‘घर’ का ना ‘घाट’ का अशी परिस्थिती आली आहे. 

संग्रहित फोटो

महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
अधिकाऱ्यांवर हल्ला होऊनसुद्दा महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. उलट वरिष्ठांनी पीडित मंडळ अधिकारी व तलाठी यांनाच दोन शब्द सुनावले असल्याची चर्चाही रंगली आहे. तसेच पोलीस प्रशासनही याकडे या प्रकरणात गांभीर्याने बघत नसल्याचे दिसत आहे. मंगळवारी पांढरकवडा सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यामुळे वणी पोलिसांनी आरोपीला जामीन मिळण्यासाठी तर जाणून बुजून इतके दिवस अटक केलेली नाही, याची जोरदार चर्चा आहे.

मंडळ अधिकारी ‘सुलार’ ?
मंगळवारी रात्री 8 वाजता दरम्यान नांदेपेरा रोडवरील वऱ्हाडी ढाबा समोरील रस्त्यातून थेट एका अपार्टमेंट समोर खुल्या जागेवर रेतीचा टिप्पर क्र. MH34 2930 हा खाली होत असल्याची माहिती एका नागरिकांनी महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्यांना फोन करून दिली. सदर अधिकाऱ्यांनी याबाबत लगेच मंडळ अधिकारी कुमरे याना सदर अपार्टमेंट जवळ पोहचण्याचे आदेश दिले. मात्र मंडळ अधिकारी त्यांना ती जागाच सापडली नाही. ते ‘सुलार’ असल्याने त्यांना जागा सापडली नसल्याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.

संग्रहित फोटो

काय आहे हे प्रकरण
21 मे रोजी सायंकाळी 4 वाजता दरम्यान गणेशपूर मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे व तलाठी बन्सीलाल सिडाम यांनी छोरिया ले आऊट मध्ये रंगनाथ रेसिडेन्सीच्या मागे विना परवाना रेती भरलेला एक ट्रक पकडला होता. मात्र रेती तस्कर उमेश पोद्दार यांनी दोघांना न जुमानता देशपांडे व सिडाम यांना धक्काबुक्की करून तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन रेती भरलेला ट्रक जबरीने खाली करून घेतला. एवढेच नव्हे तर ट्रक चालकांनी महसूल अधिकाऱ्यांना कट मारून ट्रक पळवून नेले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्देशानुसार मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे व तलाठी बन्सीलाल सिडाम यांनी त्याच रात्री वणी पोलीस स्टेशनमध्ये रेती तस्कर उमेश पोद्दार (38) विरुद्द दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्द कलम 353, 506, 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल केले. गुन्हा दाखल होताच आरोपी उमेश पोद्दार फरार झाला होता. तर पोलिसांनी ट्रक क्र. MH34 M 3681 जप्त करून ट्रक चालकास अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.