महादापूर या दुर्गम गावात कोरोनाचा शिरकाव झालाच कसा?

जवळच्या व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह, विविध चर्चेला उधाण....

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील महादापूर येथील महिलेचा 3 जुलैला प्रसुतीनंतर यवतमाळ येथे मृत्यू झाला. सदर महिलेची चाचणी केली असता ती कोरोना पॉजिटिव्ह आली. मात्र झरी तालुक्यातील एका दुर्गम गावात कोरोना शिरलाच कसा? याबाबत परिसरात महिलेच्या मृत्यूनंतरच चर्चा सुरू झाली. आता या महिलेच्या जवळचे व्यक्तीही निगेटिव्ह आले असल्याची माहिती मिळत असल्याने त्या महिलेचा मृत्यू प्रसुती दरम्या तर झालेला नाही या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तिचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे झाला असल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही महादापूर येथील रहिवाशी होती. लग्नानंतर ती मेटिखेडा जवळील रुढा या गावी राहत होती. गर्भवती असल्याने ती 10 मार्च रोजी माहेरी आली होती. 13 मार्चला ती सोनोग्राफीसाठी अदिलाबाद येथे गेली होती. दिनांक 2 जुलै रोजी पोट दुखत असल्याने तिला झरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. मात्र महिलेचे पोट दुखणे या प्रसुती कळा होत्या हे निष्पन्न झाले नाही.

दरम्यान पोटात कळा आल्याने डॉक्टरांनी तिच्यावर पोटदुखीचा उपचार केला. मात्र त्यानंतर तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला. तिची पोट दुखी सुरूच होती. डॉक्टरांनी तीन प्रसुतीची तास वाट बघितली. अखेर उलट्या थांबत नसल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी पांढरकवडा येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर केले.

पांढरकवडा येथे डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली. सततच्या उलट्यांनी तिला अशक्तपणा आला होता. तिची परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला तात्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर रातोरात तिला यवतमाळला हलवण्यात आले.

सकाळी महिलेला प्रसुती कळा आल्या. महिनेने बाळाचा जन्म दिला मात्र त्याचा लगेच मृत्यू झाला. थोड्या वेळात महिलेला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तिथल्या डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी तिला लगेच कॉरन्टाईन कक्षात भरती केले. तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र तपासणी रिपोर्ट येत पर्यंत सदर महिलेचा मृत्यू झाला होता. रिपोर्ट आल्यावर सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली, कारण सदर महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव आला होता.

या प्रकारामुळे झरी तालुक्यात एकच खऴबळ उडाली. कारण महादापूर सारख्या दुर्गम गावात कोरोनाचा शिरकाव झालाच कसा हा प्रश्न उपस्थित केला गेला. प्रशासनाने पॉजिटिव्ह महिला संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना कॉरन्टाईन केले. यात महिलेचे कुटुंबीय, शेजारी, दाखल केलेल्या रुग्णालयातील स्टाफ, ऍम्बुलन्सचा ड्रायव्हर इत्यादींचा समावेश आहे.

3 जुलैला महिलेचा मृत्यू झाला. त्याच दिवशी हाय रिस्क व लो रिस्क लोकांना ट्रेस करून त्यांना कॉरन्टाईन करण्यात आले. 4 तारखेला 23 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातील 21 जण निगेटिव्ह आलेत तर दोघांचे रिपोर्ट पेन्डींग आहे. 5 तारखेला 40 जणांचे स्वॅब पाठवण्यात आले. त्याचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.

कोरोनाने नाही तर चुकीच्या उपचाराने मृत्यू – कुटुंबीयांचा आरोप
महिलेमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणं नव्हती. ना तिला भेटायला येणा-यांमध्ये कोरोनाचे लक्षणं होते. तिचा मृत्यू उपचार करणा-या डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे व हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. जर ती पॉजिटिव्ह असती तर घरातील कुटुंबीयांपैकी कुणालातरी कोरोना झाला असता, मात्र कुणातही कोरोनाचे ना लक्षणं दिसून आले ना कुणी पॉजिटिव्ह निघाले त्यामुळे याला फक्त चुकीचा उपचार कारणीभूत असू शकतो, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

महिला पॉजिटिव्ह निघाली हा डॉक्टरांनाही धक्का…
उपस्थित असलेल्या डॉक्टारांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला जेव्हा झरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा एका गर्भवती महिलेवर जे उपचार केले जातात तेच केले गेले. तिला वेगळी अशी कोणतीही ट्रिटमेन्ट देण्यात आली नाही. मात्र पोटातील कळा या प्रसुती कळा होत्या की दुस-या कारणांमुळे याची तपासणी करण्यासाठी 3 तास महिलेला रुग्णालयातच ठेवण्यात आले. मात्र दरम्यान सारख्या ओका-या सुरू असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी पांढरकवडा हलवण्याचा सल्ला दिला.

महिेलेला कोरोना होता का याविषयी बोलायचे झाल्यास महिलेमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणं नव्हते हे खरे आहे. मात्र अलिकडे कोरोनाचे लक्षणं बदलले आहेत. भारतातील काही व्यक्तींना नवीन लक्षणं सापडले आहेत. यात हगवण सारखे लक्षणंही दिसून येतात. तर काही केस मध्ये कोणतेही लक्षणं नसलेली ठणठणीत व्यक्तीही पॉजिटिव्ह निघाली आहे. जर महिलेमध्ये कोरोनाचे लक्षणं असते तर तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी आधीच सर्व काळजी घेतली असती. शिवाय तिथे तीन तास ठेवण्याऐवजी आधीच तिला यवतमाळला हलवण्याचा सल्ला दिला असता. पांढरकवडा व यवतमाळला हलवल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनीही ही काळजी घेतलेली नव्हती. रिपोर्ट नंतरच तिथल्या डॉक्टरांना कॉरन्टाईन करण्यात आले. जर तिच्यात कोरोनाचे लक्षणं असते तर कुणी जवळही गेले नसते, ती महिला पॉजिटिव्ह निघाल्याने डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. अशीही माहिती डॉक्टरांनी दिली.

संपूर्ण महादापूर गाव प्रतिबंधीत क्षेत्र घोषित

दुर्गम गावात कोरोनाचा शिरकाव झाला तरी कसा?
सदर महिला 13 मार्च रोजी अदिलाबादला उपचारासाठी गेली होती. पण या घटनेला तीन महिने लोटून गेले. दरम्यानच्या काळात ना तिच्यात कोणते कोरोनाचे लक्षणं आढळले ना तिच्या कुटुंबीयांना. या महिलेला भेटण्यासाठी केवळ तिचा पती येत असल्याची माहिती आहे. मात्र त्या महिलेचा पतीही निगेटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. अनेक घटनांमध्ये आधी निगेटिव्ह येऊन आठवडाभरानंतर पॉजिटिव्ह आल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे नेमकं काय झालं हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

महादापूर या गावात एकच हाफशी आहे. या हाफशीवर गावातील सर्व व्यक्ती पाणी भरतात. दरम्यान या महिलेला भेटण्यासाठी आशा सेविकाही आल्या होत्या मात्रा गावात कुणामध्येही तसेच आशा सेविकांमध्ये कोरोनाचे लक्षणं नव्हते. शिवाय त्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. दरम्यान मृताच्या कुटुंबीयांनी कोरोनामुळे नाही तर डॉक्टरांच्या चुकीचा उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. 4 जुलै रोजी हाय रिस्क मधले 21 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 2 रिपोर्ट अद्यापही येणे बाकी आहे. तसेच 5 तारखेचे 40 रिपोर्टही येणे बाकी आहे.

रिपोर्ट निगेटिव्ह येत असल्याने तालुक्यात विविध चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियातूनही वेगवेगळे तर्क लावले जात आहे. नेमका महादापूर सारख्या गावात कोरोनाचा शिरकाव झाला तरी कसा? याचे कारण अद्याप कळलेले नाही. जेव्हा हे संपूर्ण रिपोर्ट येणार तेव्हाच कोरोनाचा शिरकाव कसा झाला याचे उत्तर मिळू शकेल व याबाबत जे तर्क वितर्क व विविध चर्चा होत आहे त्या चर्चा, शंका कुशंकानाही विराम मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.