पुराने घेतला शेकडो पशूधनाचा जीव, रात्रीत झाले होत्याचे नव्हते…

सेलू (खुर्द) येथील शेतक-याचे 10 पशूधनाचा मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पुराने शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेती तर पुराच्या पाण्याने खरवडली त्यामुळे शेतक-यांचे नुकसान तर झालेच सोबतच अनेक शेतक-यांच्या पशूधनाचाही या पुरात जीव गेला आहे. रामचंद्र कालेकर यांचे 12 पैकी 10 पशूधन व 40 पैकी 39 कोंबड्यांच्या मृत्यू पुरामुळे झाला आहे. एकीकडे शेती गेली तर दुसरीकडे पशूधनही गेले, सोबतच खते आणि अवजारेही वाहून गेली आहे. त्यामुळे आता काय करावे या पेचात शेतकरी पडला आहे. दरम्यान पुरामुळे अनेक लोकांचे घरांचीही पडझड झाल्याची माहिती आहे.

रविवारी रात्री वर्धा नदीच्या पात्रात वाढ होण्यास सुरुवात झाली. रात्रीतून वर्धा नदी काठावरील गावाला गावाला पुराने वेढा दिला. सोबतच शेतही पुराच्या पाण्यात आले. अनेक शेतक-यांना पुराचा इतका कहर असेल याची कल्पना नव्हती. त्यामुळे अनेक शेतक-यांना शेतात असलेला माल, पशूधन, शेतीची अवजारे, खत, बि-बियाणे आणायलाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे पुरामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.

सेलु (खुर्द) येथील शेतकरी रामचंद्र कालेकर यांची नांदेपेरा रोडवर शेती आहे. त्यांच्याकडे 12 जनावरे होती. सोबतच शेतीला जोडधंदा म्हणून ते कुकुटपालनाचा व्यवसायही करायचे. शेतातील बंड्यात त्यांनी त्यांची 12 जनावरे बांधली होती. अचानक वाढलेल्या पुरामुळे त्यांना पशूधन सुरक्षीत ठिकाणी घेऊन जाण्याचा वेळही मिळाला नाही.

मुक्या जनावरांचा घेतला पुराने जीव
आज पूर ओसरल्यावर कालेकर हे शेतात गेले असता तिथे त्यांना त्यातील 10 जनावरे मृत अवस्थेत आढळले. यात 3 गायी, 6 बैल व एका गो-याचा समावेश आहे. तर केवळ 1 गाय व एक गोरे यातून वाचू शकले. तर 40 नग कोंबड्यापैकी 39 कोंबड्या बेपत्ता झाल्या. त्यातील केवळ एकच कोंबडी झाडावर असल्याचे आढळले. उर्वरित 39 कोंबड्या पुरात वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

अनेक घरांचे पुरामुळे असे नुकसान झाले आहे.

शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे कधी?
प्रशासनाने सर्वात आधी लोकांचा जीव वाचवण्यास प्राथमिकता दिली. त्यामुळे पुरात कुणाचा मृत्यू झाला नाही मात्र आर्थिक नुकसान मोठे झाले आहे. वणी व मारेगाव तालुक्यात 28 हजार पेक्षा अधिक हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर शेकडो जनावरांचा जीव गेल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच शेतीला जोडधंदा म्हणून केल्या जाणा-या कुकुटपालन करणा-या शेतक-यांनाही मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. अनेक शेतक-यांचे अवजारे वाहून गेले आहे. त्यामुळे तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी पूरग्रस्त भागातील शेतकरी करीत आहे. दरम्यान लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनातर्फे आदेश दिल्याची माहिती आहे. 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.