वणीत राष्ट्रवादीचे आमरण उपोषण सुरू

सुमारे 300 शेतकरी व कार्यकर्त्यांसह उपोषणाला सुरूवात

0

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा ही प्रमुख मागणी घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस वणी विधानसभा तर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा आणि राष्ट्रवादीचे वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंग गोहोकर यांच्यासह शेकडो शेतकरी आणि पदाधिकारी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा यासोबतच शासनाची कापूस खरेदी त्वरित सुरू करावी, शेतीला दिवसाला 12 तास वीज द्यावी, बोंडअळीची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, मागील हंगामात नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे तात्काळ द्यावे अशा मागण्या यात आहे. दुपारी सुमारे एक वाजता तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात झाली. यात वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारीही उपोषणास बसले आहे. तत्पुर्वी दुपारी 12 वाजता सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात गोळा झाले होते. तिथून वाजत गाजत सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी उपोषणस्थळी पोहोचले. इथे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी कऱण्यात आली.

या उपोषणाबाबत माहिती देताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जळगाव जिल्ह्यात दुष्काळी स्थिती यवतमाळ इतकी गंभीर नसतानाही संपूर्ण जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत कऱण्यात आला आहे. हेच जालना, बीड, पुणे जिल्ह्याला लागू पडते. मात्र यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतक-यांच्या आत्महत्या होत असताना सरकारने मात्र केवळ 9 तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याचं घोषीत केले आहे. सरकारचं हे धोरण चुकीचं आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दृष्काळग्रस्त जाहीर होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

जयसिंगजी गोहोकर म्हणाले की दुष्काळासाठी जे निकष लावण्यात आलेले आहेत. ते सदोष आहेत. इतर ठिकाणी जलसिंचनाचे कार्य झालेले आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात जलसिंचनाचे काम झालेले नाहीत त्यामुळे या जिल्हयातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. शेतक-यांच खरीप पीक तर हातून गेलंच आहे. शिवाय रबी पीकही शेतक-यांच्या हातून जाणार आहे. जर यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही तर शेतक-यांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यामुळे याकडे सरकारने गंभीररित्या लक्ष देणे गरजेचे आहे.

सदर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. ख्वाजा बेग यांच्या मार्गदर्शनात होत आहे, या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह राकाँचे वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंगजी गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, संजय जंबे, महेश पिदूरकर, संदिप धवणे, अंकुश नेहारे, विजया आगबत्तलवार, संगीता खटोड, सूर्यकांत खाडे, अंकुश मापूर, स्वप्निल धुर्वे, सिराज सिद्दीकी, भारत मत्ते, मारोती मोहाडे, राऊत, नितीन गोडे, राजू उपरकर, अशोक उपरे, रवि येमुर्ले, प्रतिभा तातेड यांच्यासह वणी मारेगाव आणि झरी तालुक्यातील सुमारे 250 ते 300 शेतकरी सहभागी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.