बहुगुणी डेस्क, वणी: कार्यक्रमासाठी मामाच्या गावी आलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यावर दगडी वरवंट्याने (बत्ता) प्रहार केला. यात महिला जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील रोहपट येथे ही घटना घडली. तसेच दुस-या दिवशी पतीने पत्नीला घरी चलण्याचा आग्रह करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडित महिला ही गोधणी येथील रहिवासी असून ती तिच्या कुटुंबीयांसह राहते. ती मजुरीचे काम करते. दिनांक 30 जानेवारी रोजी ती तिच्या नव-याच्या मामाचे गाव रोहपट ता. मारेगाव येथे तिचा पती व दोन मुलीसह गेली होती. रविवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास मामा व मामी घरातील अंगणात बसून होते. तर पीडित महिला ही घरात स्वयंपाक करीत होती. दरम्यान तिचा नवरा अचानक मागून आला व त्याने स्वयंपाक घरातील दगडी खलबत्यातील कांडण्याचा गोटा (बत्ता) उचलून पत्नीच्या डोक्यावर मारला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पत्नी किंचाळली. आवाज ऐकूण अंगणात बसलेले मामा व मामी धावत घरात आले. त्यांनी पतीच्या हातातील दगड हिसकावून फेकून दिला. डोक्यावर आघात झाल्याने महिलेला चक्कर आली. त्यामुळे मामा, मामीने गावातील ऑटो करून तिला मारेगाव येथे उपचारासाठी आणले. पतीने मारहाण केल्याने पत्नी मारेगाव येथील तिच्या आई वडिलांकडे रात्री मुक्कामाला गेली.
दुस-या दिवशी तिथे पती आला. तो तिला घरी चाल अन्यथा तुला खतम करतो, अशी जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे घाबरलेल्या पत्नीने मारेगाव येथील पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Comments are closed.