जयंती होती गांधींची, त्याने वाट पाहिली संधीची

ड्राय डेला अवैधरीत्या दारूविक्री करणा-याला तरुणाला अटक

0

सुशील ओझा, झरी: गांधीजयंतीची वाटच जणू तो पाहत होता. ‘ड्राय डे’मुळे दारू बेभाव विकण्याचा त्याचा बेत होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने त्याची ही ‘संधी’ हुकली. हातात बेड्या पडल्यात. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसा येथे दारूची अवैध विक्री करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४ हजाराची देशी दारू जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

गांधी जयंतीला ड्राय डे असतो. किमान या दिवशी तरी तळीरामच नाही तर दारू तस्कर ही सुट्टी घेत नाही. ड्राय डेला दारू मिळाली नाही तर ते गांधीचाच मार्ग अवलंबतात. खेड्याकडे चला… आणि तिकडे गेले की तळीरामाचा ‘गेम ज्यमतो’…  मात्र या प्रकरणी अवैध दारू विक्रेत्याचा गेम काही जमला नाही.

घोंसा येथे १५ ते २० दिवसांपासून अवैध दारू विक्री करीत असल्याची गुप्त माहिती बिट जमादार व शिपाई यांना मिळाली. यावरून बिट जमादार अशोक नैताम, शिपाई रमेश मस्के, प्रवीण ताडकोकुलवार व मंगेश सलाम ह्यांनी २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता दुचाकीने घोंसा गाव गाठले. अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन सापळा रचला. दारू विक्रेत्याला रंगेहात पकडले.

दारू विक्रेत्याकडून ४ हजारांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्यात. दारूविक्रेता शुभम घनश्याम तेलंग (24) रा. घोंसा याला अटक केली. दारू पुरवठा करणारा वणीतील अशोक दुर्गमवार या दोघांवर कलम 65 ई महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक नैताम व रमेश मस्के करीत आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.