बहुगुणी डेस्क, वणी: पोळ्याच्या दिवशी सुरु असलेल्या मेंढोली व लाठी चौफुली येथे शिरपूर पोलिसांनी कारवाई केली. लाठी येथे सकाळी तर मेंढोली येथे संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना लाठी चौफुली वेल्हाळा येथील आहे. दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी शिरपूर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खबरीकडून लाठी चौफुली येथे दारूची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पोलीस सकाळी 8.30 वा. या ठिकाणी गेले असता तिथे त्यांना आरोपी प्रदीप खारकर हा आढळला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 5 निप विदेशी दारू आढळली. ज्याची किंमत 900 रुपये आहे.
दुसरी घटना ही मेंढोली येथील आहे. गावातील चिकराम याच्या घरी एका खोलीत दारूची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून संध्याकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले. त्यांना चिकराम यांच्या घराच्या मागे काही लोक आढळले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच काही लोक तिथून पळून गेले. पोलिसांना जागेवर एक इसम आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव रोशन सुभाष लोहकरे (33) असे सांगितले.
घराची झडती घेतली असता पोलिसांना घरात एका प्लास्टिकच्या पिशवीत देशी दारुच्या 90 मीलीच्या 54 बॉटल आढळल्या. ज्याची किंमत 2160 रु. आहे. रोशनला दारूसाठा कुठून आणल्याची विचारणा केली असता त्याने सदर माल वणी येथील विशाल लोणारे याचा असल्याचे सांगितले. तसेच तो 300 रुपये रोजीने पैसे देतो, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
Comments are closed.