धाब्यांवर अवैध दारूविक्री जोमात, प्रशासनाचे दुर्लक्ष

जिल्हाधिकाऱ्यांना दिले परवानाधारकांनी निवेदन

0

विवेक तोटेवार, वणी: वणी, झरी, मारेगाव तालुक्यामध्ये सध्या धाब्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. याविरोधात सोमवारी परवाना धारक दारू विक्रेत्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने चंद्रपूर लगत यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर धाबा टाकून त्याद्वारे अवैध दारू विक्रीचा ट्रेंडच सुरू आहे. सध्या वणीतील अनेक लोकांनी सीमेवर धाबे टाकले आहेत. सोबतच वणी मारेगाव झरी परिसरातील अनेक धाब्यावर विनापरवाना दारू विकली जात आहे तसेच तिथे ग्राहकांना दारू पिण्यास परवानगी दिली जात आहे. या सर्व प्रकाराकडे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत आहे.

चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणीच्या सीमा लागूनच आहेत. त्यातच चंद्रपूरमध्ये दारूबंदी झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातल्या मद्य शौकिनाची चांगलीच अडचण झाली. याचाच फायदा घेऊन काहींनी सीमेवर धाबे उघडले आहेत व त्यातून ते अवैध दारूविक्री करीत आहे. या धंद्यात तथाकथित समाजसेवक व राजकारण्यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार हा गुन्हा आहे. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी राखलेल्या हितसंबंधामुळे हे प्रकार सर्रास सुरू आहे.  सदर काम काही पोलीस कर्मचारी हाताशी घेऊन हे ढाबा चालक करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. यात वणी तालुक्यातील शिरपूर, शिंदोला, झोला, झरी, मारेगाव या ठिकाणी काही व्यक्तींनी धाब्याच्या नावावर दारूविक्री सुरु केली आहे.

रात्रीच्या वेळी या धाब्यावर मद्य शौकिनाची गर्दीं पाहण्याजोगी असते. परंतु ही सर्व बाब माहितत असताना राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन मांजर बनून दूध पिण्याचे काम करीत आहे. यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तर बुडतच आहे शिवाय परवाना धारकही आर्थिक संकटात सापडले आहे. तरीही ही अवैध दारूविक्री त्वरित बंद करावी अशाप्रकारचे  निवेदन देण्यात आले आहे. वणी पोलिसांना कोण फलकाची शुटिंग करतये हे लगेच दिसून येतंय. पण धाब्यावर कोण राजरोसपणे अवैध दारू विक्री करतेय हे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता या अवैध दारूविक्रेत्यांवर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

याबाबत स्टिंग ऑपरेशन करून हे प्रकरण पुढे आणण्यात काही लोक प्रयत्नशिल असल्याची माहिती वणी बहुगुणीला मिळाली आहे. हे बाहेर आल्यानंतर अनेक समाजसेवक, राजकारणी आणि प्रामाणिकतेचा आव आणणारे लोक उघडे पडणार आहेत हे नक्की….

Leave A Reply

Your email address will not be published.