चक्क पोलिसांचीच पकडली कॉलर केली धक्काबुक्की…

अवैध दारुविक्रेत्यांची मुजोरी... कशी गेली इथ पर्यंत मजल?

बहुगुणी डेस्क, वणी: ड्राय डेच्या दिवशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकातील पोलिसांना कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यात आली. 26 जानेवारी रोजी दु. 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दोन आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांचा थेट पोलिसांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल जात असल्याने याची सर्वत्र चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान पोलिसांनी रविवारी ठिकठिकाणी धाड टाकत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली.

तक्रारीनुसार, 26 जानेवारीला ड्राय डे असतो. ड्राय डेचा फायदा घेऊन वणीत ठिकठिकाणी दारु तस्कर अवैधरित्या दारु विक्री करतात. त्यामुळे ठाणेदार यांच्या आदेशावरून पोलिसांचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान पथकाला ब्राह्मणी फाट्याजवळ अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची खबरीकडून माहिती मिळाली. त्यावरून दु. 4 वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक ब्राह्मणी फाट्याजवळ पोहोचले. तिथे फ्रेंड्स चायनिज नामक एका चायननिजच्या दुकानाजवळ दोघे जण उभे होते. यातील एक रितिक अनिल जेंगटे (25) रा. पंचशील नगर वणी तर दुसरा गणेश तुकाराम चहारे (36) रा. विवेकानंद कॉलोनी वणी होता. त्यांच्या हातात एक काळ्या रंगाची बॅग होती.

पोलिसांचे पथक चायनिजच्या गाडीजवळ गेले. त्यांनी रितिक याला बॅगमध्ये काय आहे याची विचारणा केल्यावर त्याने कोण तुम्ही? तुम्हाला काय अधिकार असे म्हणत पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलीस पथकातील कॉन्स्टेबल बॅगची तपासणी करण्यास गेले असता. रितीक याने एका पोलिसाची कॉलर पकडली व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यात पोलिसांच्या शर्टचे दोन बटन तुटले. तर गणेश हा तुम्हाला काय आमचेच धंदे दिसतात का असे म्हणत दुस-या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर धावून गेला. यातील रितिक हा दारूच्या नशेत होता.

पथकाने पोलिसी खाक्या दाखवत बॅग चेक केली असता त्यांना यात देशी दारुच्या 20 टिल्लू (90) आढळून आल्या. पोलिसांनी दारुसाठा व त्यांच्याजवळ असलेला मोबाईल जप्त केला. दोन्ही आरोपींवर अवैध दारू विक्री, धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींवर बीएनएसच्या कलम 132, 121 (1), 3(5) व महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कमल 65 ई व 85 (1) नुसार गुन्हा दाखल केला.

ड्राय डे च्या दिवशी ठिकठिकाणी धाड
ड्राय डे निमित्त वणीत ठिकठिकाणी दारू विक्री सुरु होती. पोलिसांनी करण बार समोर, दीप्ती टॉकीज परिसर व शास्त्री नगर येथे धाड टाकली. या 3 प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दारूसाठा जप्त केला. त्यांच्यावर दारुबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.