पुरुषोत्तम नवघरे, वणी: शेतक-यांकडून अवैधरित्या शेतमालाची खरेदी करणा-या एका प्रतिष्ठानावर कारवाई करण्यात आली. भूमिपुत्र ट्रेडर्स असे प्रतिष्ठानचे नाव असून कृषी उत्पन्न बाजार समिती वणी व सहायक निबंधक पथकाने सोमवारी ही कारवाई केली. या कारवाईत 486 पोते धान्य अवैधरित्या खरेदी केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी भूमिपूत्र ट्रेडर्सचे संचालक चंद्रशेखर देठे यांच्यावर बाजार शुल्क, दंड व इतर असा एकूण 1 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
शेतक-यांकडून शेतमाल खरेदी करताना व्यापा-यांनी बाजार समितीच्या यार्डातूनच शेतक-याचा माल खरेदी करण्याचा नियम आहे. यातून बाजार समितीला बाजार शुल्काच्या रुपात महसूल प्राप्त होतो. शिवाय शेतक-यांची फसवणूक देखील यातून वाचते. पण बाजार शुल्क वाचावण्याच्या नादात अनेक व्यापारी ठिकठिकाणी गोडावून मध्ये अवैधरित्या मालाची खरेदी करतात. याची बाजार समितीला माहिती मिळताच त्यांनी याची माहिती सहायक निबंधकांपर्यंत पोहोचवली.
चिखलगाव येथील भूमिपुत्र ट्रेडर्सचे संचालक चंद्रशेखर देठे यांच्याकडे बाजार समितीतून शेतमाल खरेदी करण्याचा परवाना आहे. मात्र त्यांच्याकडे शेतक-यांकडून परस्पर माल खरेदी करण्याचा परवाना नाही. भूमिपुत्र ट्रेडर्समध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी होत असल्याची माहिती वणी एपीएमसीचे सचिव अशोक झाडे यांना मिळाली. त्यांनी याबाबत सहायक निबंधक सचिन कुडमेथे यांना माहिती दिली.
त्यावरून सहायक निबंधक यांनी एपीएमसी वणी व सहायक निबंधक कार्यालयाचे एक संयुक्त पथक तयार करून सोमवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास चिखलगाव येथील भूमिपुत्र ट्रेडर्स येथे धाड टाकली. त्यावेळी या गोदावूनमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या धान्य खरेदी केल्याचे आढळून आले. मालाची मोजणी केली असता यात 486 क्विंटल माल आढळून आला. त्यानुसार देठे यांच्याकडून बाजार शुल्क 24 हजार 300 रुपये, 72 हजार 900 रुपये दंड व इतर 2800 रुपये असा एकूण 1 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाई यवतमाळ जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वणीचे सहायक निबंधक सचिन कुडमेथे, स. सहकार अधिकारी शैलेश मडावी, बाजार समितीचे अशोक झाडे इत्यादींनी केली.
Comments are closed.