एका ट्रकची दुस-या ट्रकला धडक, एकाचा मृत्यू

पुरड परिसरातील घटना, कॅबिनमध्ये फसलेल्या चालकाचा मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील पुरड परिसरात एका ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागाहून धडक दिली. या अपघातात धडक देणाऱ्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी २० नोव्हेंबरला पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. हरिसिंग मोहनसिंग यादव (२३) असे मृत ट्रक चालकाचे नाव असून, तो धवलीसागर (जि. ललितपूर, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होता. तो येथील एचआरजी कंपनीत चालक पदावर कार्यरत होता. कोळसा खाणीतून उत्खनन झालेला कोळसा रेल्वे सायडिंगवर पोहोचविण्याचे काम एचआरजी या कंपनीने घेतले आहे. त्या कंपनीच्या ट्रकवर हरिसिंग चालक म्हणून काम करीत होता. घटनेच्या दिवशी कोळसा खाली करून तो आपल्या ट्रकसह मुंगोली कोळसा खाणीकडे जात असताना पुरड गावाजवळील गतिरोधकावर त्याच्या ट्रकने समोरील ट्रकला धडक दिली. अपघातानंतर नागरिकांनी केबिनमध्ये फसलेल्या जखमी हरिसिंगला बाहेर काढून रुग्णालयात हलविले. मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तपास सुरू आहे.

Comments are closed.