कमळवेली घाटातून रेतीची अवैध तस्करी जोमात

रात्रभर नदीपात्रातील रेतीचे जेसीबीने उत्खनन

0

सुशील ओझा, झरी: लोकांना बांधकामासाठी रेती मिळावी तसेच यातून शासनाला महसूल मिळावा यासाठी रेतीघाट हर्रास केले आहे. यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असून यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शहरी भागात रेती ट्रेकने पाठवली जात असून यासाठी रात्रभर जेसीबीने नदीपात्रात रेतीचा साठा करून दिसवरात्र रेतीची वाहतूक केली जात आहे.

झरी तालुक्यात कमळवेली हा एकच रेती घाटाचा लिलाव झाला असून या घाटावरून तालुक्यासह यवतमाळ, पांढरकवडा व तेलंगणात मोठ्या प्रमाणात ट्रकने शेकडो ब्रास रेतींची वाहतूक केली जाते. तर तालुक्यासह वरील शहरात दिवसरात्र विना रॉयल्टी शेकडो ब्रास रेतीची तस्करी केली जात आहे. रेती तस्कर दिवसातून एकच रॉयल्टी काढून त्या रॉयल्टीवर तारीख व वेळ न टाकता ट्रक व ट्रॅक्टरने रेती तस्करी करत आहे.

गौनखनिज अधिनियम १९५४ अन्वये सायंकाळी ६ वाजता नंतर रेतीची वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. परंतु रेती वाहतूक व उतखनन करण्याचे नियम धाब्यावर बसवून रेती तस्कर राजरोसपणे रेती तस्करी करीत आहे. मात्र यावर महसूल विभाग कार्यवाही करीत नसल्याने तस्कारांच्या डोक्यावर महसूल विभागाचा हात तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

रॉयल्टीवर तारीख वेळ न टाकता एकाच रॉयल्टीवर दिवसभर रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैद्य रेती तस्करीची माहिती जनसामान्य पासून तर महसूलच्या वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत असूनही अद्याप एकही ट्रक किंवा ट्रॅक्टर वर कार्यवाही करण्यात आली नाही. विना रायल्टी ट्रक किंवा ट्रॅक्टर महसूलच्या कर्मचारी किंवा अधिकारी यांनी पकडले तरी मोठा आर्थिक व्यवहार करून सोडून देत असल्याची ओरड जनसामान्यांतून होत आहे.

यापूर्वी असे अनेक प्रकार घडल्याने महसूल विभागाचे मोठे सहकार्य असल्याचे बोलले जात आहे. तसेच रेती तस्करी करणाऱ्या ट्रक व ट्रॅक्टर मालक यांच्याकडून पोलीस सुद्धा दम टाकून वसुली करीत असल्याची तसेच महिनासुद्धा बांधून असल्याची विश्वासनीय माहिती आहे. रेती तस्करी करणा-यांची यादी काही पोलिसांनी गोळा केली असून ते पाळत बसून आपली कमाई करीत आहे.

महसूलच्या कर्मचा-यांना ओली पार्टी?
रेतीघाट ठेकेदार, ट्रॅक्टर मालक यांची महसूल विभागाशी साखळी असून तालुक्यातील २० ते ३० ट्रॅक्टर मालक व ठेकेदार यांनी आपल्या मालकीच्या ट्रक व ट्रॅक्टरवर कोणतीही कार्यवाही करू नये याकरिता महसूलच्या काही कर्मचारी व अधिकारी यांना तालुक्याच्या बाहेर शहरात मोठी ओली पार्टी देऊन खिसे गरम केल्याची खमंग चर्चा सध्या तालुक्यात चांगलीच रंगत आहे.

रेतिघाट ठेकेदार हे यवतमाळ व त्याच परिसरातील असून त्यात १८ ते २० पार्टनर असून त्यांचेही ठेकेदारीचे मोठे काम असल्याने ट्रकने दिवसरात्र रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती आहे. नियम डावलून रेती वाहतूक सुरू असताना कोणती कार्यवाही होत नसल्याने वरीष्ठ अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक व ट्रॅक्टर चालक मालकविरुद्ध कार्यवाहीची मागणी होत आहे. १ मे च्या रात्री सदर रेती घाटावर एका अधिकाऱ्याने भेट दिली असल्याची माहिती असून तेव्हापासून जेसीबीने रेतीचे उत्खनन बंद असल्याचे कळते. पण अवैध रेती तस्करी मात्र अद्यापही राजरोजपणे सुरू आहे,

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.