जितेंद्र कोठारी, वणी : तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 9 गोवंश जनावरे आणि 3 तस्करांना जेरबंद करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे. शिरपूरचे ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांच्या नेतृत्वात डोर्ली ते कुंड्रा मार्गावर मंगळवार 8 जुलै रोजी दुपारी 01:30 वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. जनावर तस्करांच्या ताब्यातून पोलिसांनी 1 लाख 97 हजार रुपये किमतीच्या 9 गोवंश बैलांची सुटका करून रासा येथील गौरक्षण मध्ये रवानगी करण्यात आली.
शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असताना पोलीस नायक गंगाधर घोडाम यांना गुप्त बातमीदारांकडून डोर्ली ते कुंड्रा मार्गावरून काही व्यक्ती जनावरांना निर्दयीपणे दोरीने बांधून व मारहाण करीत पायदळ जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ ठाणेदार गजानन करेवाड यांना याबाबत कळविले. माहिती मिळताच ठाणेदार करेवाड यांनी पोलीस स्टाफ व दोन पंचासह कुंड्रा गावाकडे जाणाऱ्या नाल्याजवळ सापळा रचला.
दुपारी 1.30 वाजता दरम्यान धुनकी डोर्ली मार्गे 3 ईसम 9 गोवंशीय जनावरांना एकमेकांना अखंड दोरीने बांधुन पळवत मारहाण करीत तसेच जनावरांच्या शेपुट पिरघळुन छळ करीत कुंड्रा कडे येतांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवुन त्यांच्या नावपत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव रमेश पेंदोर, देविदास भोस्कर व भोलाराम पडोळे असे सांगीतले. त्यांनी सदर जनावरे ही डोर्ली येथुन आणली असुन ती कुंड्रा गावातील सचिन महादेव थेरे यांचे मार्फत कत्तलीकरिता तेलंगणा राज्यातील बेला येथे नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
शिरपूर पोलिसांनी जनावर तस्करांच्या ताब्यातून 9 गोवंश बैलांची सुटका करून चारापाणीची व्यवस्था नसल्यामुळे रासा येथील श्रीराम गोरक्षण ट्रस्ट येथे पाठविले. तसेच महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांच्या कत्तलीवर प्रतिबंध असताना कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करणारे आरोपी रमेश शालीकराव पेंदोर (38), देविदास नानाजी भोस्कर (42) दोघे रा. कुड्रा तसेच भोलाराम सुरेश पडोळे (28) रा. डोर्ली व सचिन महादेव थेरे (38) रा. कुंड्रा, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ यांच्या विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11 (1), (C), (H), (J), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ), 5 (ब), 9 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सपोनी गजानन करेवाड, पो.ना. गंगाधर घोडाम, राजन इसनकर, अभिजीत कोषटवार, विनोद काकडे यांनी पार पाडली.
Comments are closed.