सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध वाहतुकीमुळे अनेकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. झरी ते कोडपखिंडी, माथार्जून मार्ग शिबलापर्यंत खाजगी गाडी, ट्रॅक्स, कमांडर व इतर गाड्यांनी जीवघेणा प्रवास सुरु आहे. प्रत्येक गाडी मध्ये २० ते ३० प्रवासी कोंबून भरतात. तर वाहनांच्या मागच्या व बाजूच्या साईडने लटकून वाहतूक केली जात आहे . ज्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
माथार्जून, शिबला व झरी आठवडी बाजार भरत असल्याने त्या परिसरातील गोरगरीब आदिवासी जनता भाजीपाला व इतर साहित्य खरेदीकरिता येत असतात. याचाच फायदा घेत जनतेच्या जीवाशी खेळ करत वाहतूक सुरू आहे. हा सर्व प्रकार पोलिसांना माहीत असूनही कोणतीही कार्यवाही केली जात नाही. या अवैध वाहतुकीला “अर्थपूर्ण” संबंध असल्याने चालना देत असल्याची चर्चा आहे. तरी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैद्य वाहतुकीवर आळा बसवून पुढील होणारे अपघात टाळावे अशी मागणी होत आहे.