बहुगुणी डेस्क, वणी: वणीतून तेलंगणा येथे गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला पाटण पोलिसांनी पकडले. झरी जवळील दुर्भा रेल्वे फाटकाजवळ दिनांक 4 मार्च रोजी दु. दीड वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना एका पिकअप वाहनात दोन गोवंश निर्दयीपणे बांधून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन गोवंश व पिकअप वाहन असा 5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वणीतील एका तरुणावर विविध कलामानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारीनुसार, मंगळवारी दिनांक 4 मार्च रोजी दुपारी पाटण पोलिसांना खबरीकडून वणीहून एक पिकअप वाहन गोवंश घेऊन तेलंगणात जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पाटण पोलिसांनी झरीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या दुर्भा रेल्वे फाटकाजवळ सापळा रचला. दु. 1.30 वाजताच्या सुमारास या ठिकाणी एका टाटा पिकअप वाहन (MH-29-BE-6839) आले. पोलिसांनी सदर वाहन थांबवले. पिकअपची पाहणी केली असता त्यांना मागे दोन गोवंश वय अंदाजे 2 आढळून आले.
या गो-ह्यांना आखुड दोरीने बांधून होते. तसेच त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी चालकाला सदर जनावरे कुणाची आहे, याबाबत विचारणा केली. त्यावर चालकाने सदर जनावरे वरोरा बाजारातून विकत घेतले असून हे जनावरं तेलंगणात विक्रीसाठी नेत असल्याची माहिती दिली. चालकाला पोलिसांनी खरेदी विक्रीची पावती मागितली. मात्र चालकाकडे सौद्याची कोणतीही पावती नव्हती. त्यामुळे पोलिसांनी गो-हा व वाहन जप्त केले.
या प्रकरणी पोलिसांनी चालक जिब्राण शेख अखिल (25) रा. शास्त्रीनगर वणी याला अटक केली. त्याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्याच्या कलम 11(1) (a), 11(1) (d), 11(1) (e) , 11 (1) (h) व मपोकाच्या कलम 83 व 177 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पाटण पोलीस करीत आहे.
Comments are closed.