झरी तालुक्यातील कुमारी मातांचं पुनर्वसन कधी होणार ?
अद्यापही रोजगार किंवा मानधन नाही, मिळतात फक्त आश्वासने
रफिक कनोजे, झरी: यवतमाळ जिल्यातील अत्यंत मागास असलेला आदिवारी आणि नक्षलग्रस्त तालुका आणि देशातील सर्वात लहान आदिवासी नक्सलग्रस्त तालुका आणी देशातील सर्वात लहान पंचायत समिती म्हणून झरीची ओळख आहे. जसा जिल्ह्यात शेतकरी आत्महतेचा प्रश्न गंभीर आहे, तसाच तालुक्यात कुमारी मातेचा प्रश्न आहे. कुमारी मातांच्या पुनर्वसनाचा आणि रोजगाराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. २०१३ मधे प्रसार माध्यमातून कुमारी मातांविषयी बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. त्यानंतर एनजीओ आणि सरकारला जाग आली. मात्र गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविले जात आहे.
२०१३ नंतर अनेक संस्थानी झरी तालुक्यात धाव घेतली. मात्र इथे केवळ वाटण्यात आली आश्वासनांची खैरात. २९ मे २०१४ ला विधानपरीषद सदस्या नीलम गोऱ्हे ह्यानी पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित अधिका-यांना सोबत विशेष सभा घेतली. त्यानंतर बंद खोलीत कुमारी माता सोबत चर्चा केली. त्यानंर त्यांनी काही आश्वासने दिले पण ते अजूनही पुर्ण झाले नाही.
आदिवासी प्रकल्प विकास महामंडळ पांढरकवडा द्वारा रमाई बहुउद्देशीय कल्याण संस्था मार्फत अनिता जांभूळकर यांनी शिबला येथे कुमारी मातांना १ एप्रिल २०१५ ते २२ मे २०१५ पर्यंन्त शिलाई मशीनचे कुमारी मातांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणानंतर १३० शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. शिलाई मशिन चालवणे आणि कपडे शिलाई करणे ह्या महिला तर शिकल्या पण आता त्यांच्याकडे कपडे शिवणार कोण ?
१४ जानेवारी २०१६ ला सकाळी १० वाजता यवतमाळ येथे नीलम गोऱ्हे पुन्हा कुमारीमाता विषयी परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिका-यांसोबत पुनर्वसनासाठी उपाययोजना संबधी चर्चा केली. त्यानंतर दुपारी ३ वाजता झरी तहसिल मधील पाटणाई मंदिराच्या मैदानातील मंडपमध्ये कुमारी मातांना स्वधार केंद्र, मानधन आणि पुनर्वसनाचे आश्वासन दिले गेले. २० सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांनी सुध्दा विशेष सभा घेऊन सर्व विभागाचे पदाधिकारी आणि अधिका-यांसोबत उपाययोजने बद्दल माहिती घेतली.
आज केंद्रातील आणि राज्यातील सत्तेत सेना आहे. नीलम गोऱ्हे या स्वतः एक ज्येष्ठ महिला आहेत. कुमारी मातांच्या भावना त्या स्वतः जाणू शकतात. आजही झरी तहसील मधल्या कुमारीमातांना नीलम गोऱ्हे यांच्यावर विस्वास आहे. नीलमताई गोऱ्हे त्यांना न्याय मिळवून देईल या प्रतीक्षेत त्या आहेत.
कुमारी मातांना काम दिलं जाऊ शकते
कुमारी मातांनी शिलाई मशीन चालवण्याचं शिक्षण देतलं आहे. शासनामार्फत झरी तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परीषद शाळांचे आणि प्रत्येक आश्रम शाळांचे विद्यार्थ्यांचे गणवेश जरी ह्या कुमारी मातांना शिवायला दिले तरी त्यांच्या हाताला काम मिळू शकते. सोबतच शासना मार्फत ह्या कुमारी मातांना कायमस्वरुपी मानधन व त्यांच्या मुलांचे पदवी पर्यंतचे विनामुल्य शिक्षण व त्यांना कोणत्याही योजनेतून कायमस्वरूपी आवास देऊन पुनर्वसन केले तर त्या समाजात चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकते.