जितेंद्र कोठारी, वणी: वणी व पांढरकवडा उपविभागात अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी विशेष पोलीस पथक स्थापन केले होते. हे पथक योग्यरित्या कर्तव्य पार पाडत असतानाही अवघ्या 22 दिवसातच या पथकाचे विसर्जन करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सपोनि मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वात पथकाने गेल्या 20 ते 22 दिवसांत अनेक धाडसी कारवाई करत लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. मात्र नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेवर पाठवून विशेष पथकाची कार्य सेवा समाप्त केल्याचे आदेश निर्गमित केले. धडाकेबाज कारवाई केल्यानंतरही पथक विसर्जित केल्याने आश्चर्य तर व्यक्त केले जात आहे शिवाय विविध चर्चेलाही उधाण आले आहे.
वणी उपविभागातील वणी, शिरपूर, मारेगाव, मुकुटबन व पाटण तर पांढरकवडा उपविभागातील पांढरकवडा, वडकी, राळेगाव, घाटंजी व पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांवर कार्यवाहीचे अधिकार विशेष पोलीस पथकाला प्रदान करण्यात आले होते. या पथकात प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी घेण्यात आला होता. मुकुंद कवाडे या पथकाचे प्रमुख होते. वणी येथील दीपक टॉकीज चौपाटी परिसरातील पोलीस चौकीमध्ये या पथकाचे कार्यालय तयार करण्यात आले. कार्यालयासाठी नवीन फर्निचर, संगणक, स्टेशनरी व इतर साहित्यही खरेदी करण्यात आले.
विशेष पोलीस पथकाने नेमणुकीच्या दुसऱ्याच दिवशी कामाचा धडाका दाखवत चारगाव चौकीजवळ अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळत 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पथकाने अवैध रेती, गुटखा व खत विक्रेत्यांवर ताबडतोड कारवाई करून आपली जबाबदारी पार पाडली. ही कारवाई सातत्याने सुरू होती. जी कारवाई ठाणेदारांना जमली नाही ती कारवाई विशेष पथकाने करून दाखवल्याने हे पथक सर्वसामान्यांमध्ये अल्पावधीतच चांगलेच लोकप्रिय झाले. तर तस्करांचे, अवैध व्यावसायिकांची या पथकाने झोप उडवली.
पथक प्रमुखाला पाटण पोलीस ठाण्याचा प्रभार
सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक धडाकेबाज कारवाई करणा-या पथकाचे प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे यांना पाटण पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळेच हे पथक विसर्जित करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र या सर्व घडामोडीबाबत सर्वसामान्यांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रभार इतर ठाणेदारांना किंवा इतर कुणाला देता आला असता. केवळ पथक विसर्जित करण्यासाठीच तर मुकुंद कवाडे यांना पाटण ठाण्याचा प्रभार तर देण्यात आला नाही, अशी देखील कुजबुज सध्या सुरु आहे.
राजकीय दबाव की ठाणेदारांची नाराजी?
विशेष पोलीस पथकाच्या कारवाईचा सपाटा सुरूच होता. सध्या पथक विसर्जित करण्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे. येत्या काही दिवसात आणखी काही साहसी व मोठ्या कारवाई या पथकाच्या रडार होत्या. हा देखील यातील एक तर्क आहे. याशिवाय एका कारवाईत एका राजकीय नेत्याचे हितसंबंध गुंतले असल्याचीही खमंग चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे या पथकाचे ‘पिछे मुड’ झाल्याचा आणखी एक तर्क आहे. तसेच या पथकामुळे पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे ‘इगो हर्ट’ झाल्याचेही बोलले जाते.
कर्तव्यात कसूर ठेवल्याने, आवश्यक तो रिझल्ट न मिळाल्याने किंवा गरज संपल्याने असे स्पेशल पथक विसर्जित केले जाते. मात्र इथे ना कर्तव्यात कसूर होती, ना रिझल्ट शुन्य होता, ना गरज संपली होती. तरी देखील पथक विसर्जित केल्याने सर्वसामान्यांच्या मनात केवळ तर्कवितर्कानेच नाही तर संशयानेही जागा घेतली आहे.