वणीत 2 ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना, हँडल लॉक केलेल्या दुचाकीही चोरी…

शासकीय मैदानावर फिरायला आलेल्या शिक्षकाची दुचाकी गेली चोरीला. चोरट्यांचा हैदोस कधी होणार कमी?

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात चोरट्यांचा हैदोस काही केल्या कमी होताना दिसत नाही. बंद घर फोडण्याच्या घटना सुरू असतानाच आता घरासमोर लॉक करून ठेवलेल्या दुचाकीही चोरटे पळवायला लागले आहे. नुकतेच दोन दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील पहिली घटना ही शासकीय मैदानासमोर तर दुसरी घटना ही नांदेपेरा रोडवर घडली आहे. यातील एका घटनेत चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. मात्र सीसीटीव्हीची भीती देखील चोरट्यांना उरली नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

देविदास विठ्ठल पेंदोर हे महावीर नगर गणेशपूर येथील रहिवासी आहे. ते सोनेगाव येथील जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक आहे. त्यांच्याकडे शिक्षणानिमित्त त्यांचा पुतण्या राहतो. त्याच्याकडे पॅशन प्रो (MH34 AY2486) ही दुचाकी आहे. देविदास व त्यांचा पुतण्या दोघेही ही दुचाकी वापरायचे. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास देविदास हे दुचाकी घेऊन शासकीय मैदानावर फिरायला गेले होते. तिथे त्यांनी दर्ग्याजवळील मैदानाच्या गेटजवळ दुचाकी ठेवली. 8 वाजताच्या सुमारास ते मैदानावरून फिरून परत आले असता त्यांना गेटजवळ गाडी आढळली नाही. दुचाकी चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदवली.

चैतन्य सुरेश बाजोरिया (23) हा नांदेपेरा रोडवरील बँक कॉलोनी येथील रहिवासी असून तो शिक्षण घेतो. त्याच्याकडे बजाज कंपनीची पल्सर आरएस 200 (MH12 QQ1728) ही दुचाकी आहे. 2 जानेवारी रोजी रात्री उशिरा चैतन्यने घरासमोर दुचाकी हँडल लॉक करून पार्क केली होती. दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला घरासमोर दुचाकी आढळून आली नाही. घराजवळ लावलेले सीसीटीव्ही चेक केले असता त्याला मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती दुचाकी नेताना दिसले. गाडी चोरी गेल्यावर त्याने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.

चोरट्यांचा हैदोस कधी होणार कमी?
आधी घर, नंतर दुकाने, दुचाकीकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला आहे. याआधी दुचाकी चोरटे सापडले आहे. मात्र त्यानंतरही दुचाकी चोरीच्या घटनेत कोणतीही कमी आली नाही. त्यामुळे अनेक दुचाकी चोरटे किंवा दुचाकी चोरट्यांच्या अनेक टोळ्या असाव्यात असा अंदाज बांधला जात आहे. वणीकर सातत्याने होणा-या चोरीच्या घटनेमुळे हैराण असले तरीही अद्याप पोलिसांना मात्र चोराचा सुगावा काही केल्या लागताना दिसत नाही. नवीन ठाणेदारांकडूनही वणीकरांना मोठ्या अपेक्षा आहे. मात्र त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतरही चोरीच्या घटनांचा छडा तर लागलेला नाहीच, मात्र चोरीच्या घटनेमध्येही कोणतीही कमतरता आलेली नाही. 

या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांना सीसीटीव्हीची भीती देखील राहिली नसून आता हँडल लॉक केलेल्या दुचाकी देखील चोरीला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा: 

ब्रेकिंग न्यूज: शिवसेना (शिंदे) गटाला मोठा धक्का, यवतमाळ जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा ?

साउथचा सुपरस्टार थलपथी विजयचा वारीसू सिनेमा रिलीज….

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!