विलास ताजने, वणी: इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स फॉर स्टॅंडरायझेशन हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र शिरपूर पोलीस स्टेशनला मिळालं. या सर्टिफिकेटमुळे शिरपूर पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा दर्जा वाढला आहे. नियमावलीतील निकषांची पूर्तता केल्यामुळे वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याला आय.एस.ओ. प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या हस्ते शिरपूरचे ठाणेदार अनिल शिवराम राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावळे यांना दि. 17 गुरुवारी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. यामुळे शिरपूर पोलीस ठाण्याच्या कार्यात एक नवा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या शिरपूर पोलीस ठाण्याच्या कार्याचा आढावा यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे दि.14 व 15 सप्टेंबरला घेण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणालीचे निरीक्षण पथकाकडून करण्यात आले. यावेळी भारतीय दंड विधान कायदा 1860 च्या अनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या अंतर्गत येत असलेले दखलपात्र अदखलपात्र गुन्हे
दरोडा, चोरी, अपहरण, विनयभंग, दंगल, विवाहितेचा छळ, अवैध धंदे, विशिष्ट उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमविणे, फसवणूक करणे, खून आणि खुनाचा प्रयत्न करणे आदींवर लक्ष केंद्रित करून कायदा व सुव्यवस्था राखणे आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचा लेखाजोखा तयार करण्यात आला.
पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार सतीश चवरे यांच्या कार्यकाळातील उत्कृष्ट कार्याचीही दखल घेण्यात आली. याप्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याची पाहणी केली. कोरोना काळातील उपाययोजना, कार्य, सामाजिक सणांच्या वेळी पोलीस बंदोबस्त, परिसरातील गुन्ह्यांची नोंद आदी बाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)