नूतन आदर्श महाविद्यालयात ‘जगू कविता: बघू कविता’ व सूत्रसंचालन कार्यशाळा

0

बहुगुणी डेस्क, उमरेडः विदर्भातील ख्यातनाम कवी, गीतकार व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘जगू कविता: बघू कविता’ हा कार्यक्रम नूतन आदर्श महाविद्यालयाच्या मराठी विभागात झाला. मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांसोबत ‘कविता आणि सकारात्मकता’ या विषयावर त्यांनी ‘जगू कविता: बघू कविता’ कार्यक्रमातून संवाद साधला. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी वक्तृत्त्वकला कशी विकसित करावी, कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन कसे करावे यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन ठाकरे यांनी केले.

मानवी जीवनातील समृद्ध व आश्वासक पैलूंकडे कसे पाहावे याचं सुलभ व सोपं तत्त्वज्ञान ठाकरे यांनी अनेक कवींच्या कवितांमधून मांडलं. संत तुकाराम, संत चोखामेळा, मंगेश पाडगावकर, ग्रेस, सुरेश भट, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, गालीब, रॉबर्ट फ्रॉस्ट, माधव ज्युलियन, विंदा करंदीकर, संदीप खरे अशा अनेक कवींच्या कवितांमधून त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील सकारात्मक बाजूंचा परिचय करून दिला.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, आपण आपल्याकडे नसलेल्या गोष्टींच्याच दुःखात अधिक रमण्याचा प्रयत्न करतो. त्याऐवजी आपल्याकडे काय काय सुंदर आहे, त्याची यादी करावी. त्यातील आनंद द्यावा आणि घ्यावा. पाडगावकरांची ‘‘सांगा कसं जगायचं’’ ही कविता ऐकवितांना त्यांनी जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. दातृत्त्वाची महती सांगताना ‘‘ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुलं द्यावी’’ ही दत्ता हलसगीकरांची कविता पेश केली.

 

महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा भाग म्हणून प्राचार्य डॉ. अनंत बुरडकर यांनी हा उपक्रम घेतला. मराठी विभागप्रमुख प्रा. विनोद मांडवकर यांच्यासह डॉ. विलास गजबे, डॉ. प्रशांत राऊत, प्रा. संजीव कोंडेकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.