सावित्रीआई शिक्षणाच्या स्फूर्तिनायिका: सुनील इंदुवामन ठाकरे
आदर्श हायस्कूल घोन्सा येथे ‘‘जगू कविता: बघू कविता’’
निकेश जिलठे, घोन्सा: क्रांतज्योती सावित्रीआई फुले या शिक्षणाच्या स्फूर्तिनायिका आहेत. भारतात महात्मा जोतिबा फुले यांनी जी शिक्षणासाठी व दीनोद्धारासाठी जी चळवळ उभी केली तिला सावित्रीआईंनी खंबीरपणे साथ दिली. स्त्री शिक्षण, त्यांची दास्यत्त्वातून मुक्ती, विधवाविवाह, केशवपनाला विरोध, प्लेगच्या साथीत त्यांनी केलेली सुश्रूषा अशारीतीने त्यांचा चौफेर प्रवास सुरू झाला. पुढे चालून त्यांची कविता फुलू लागली. जगद्गुरू तुकोबारायांनी त्यांच्या अभंगांतून समाजाच्या डोळ्यांत अंजन घातले.सावित्रीआईंनीदेखील त्यांच्या कवितेतून सातत्याने अनेक अनिष्ट बाबींवर प्रहार केलेत. त्यांचे ‘‘काव्यफुले’’ आणि ‘‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’’ हे काव्यसंग्रह म्हणजे त्याकाळातील क्रांतिकारी पाऊल असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम कवी, निवेदक, मुक्तलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.
स्थानिक आदर्श कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीआई फुले जयंतीनिमित्त आयोजित ‘‘जगू कविता: बघू कविता’’ ह्या त्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय बोबडे होते. यावेळी काव्यपीठावर प्रा. नवघरे, प्रा. चिव्हाणे, प्रा. दूधगवळी, सुशील निकोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
फुले दाम्पत्याच्या कार्यात अनेक संकटे आलीत. अनेक विरोध त्यांनी सहन केलेत तरी ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाही. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रेरणेतून मुळातच प्रतिभावंत असलेल्या सावित्रीआई लिहित्या झाल्यात. समाजभान, कर्तव्यभान देणाÚया कवितांसह मानवता, निसर्ग, लोकव्यवहार, अंधश्रद्धांवर प्रहार असे अनेक विषय त्यांनी कवितेत हाताळलेत. केवळ लिहून किंवा बोलूनच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी मानवाच्या व मानवतेच्या उत्कर्षासाठी सातत्याने संघर्ष केला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बोबडे यांनी क्रांतिज्योती सावित्रीआई यांच्या कार्य व कर्तत्त्वाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन उमाकांत गहुकर याने, प्रास्ताविक प्रांजली कोटरंगे याने तर आभारप्रदर्शन महेश मंडाळी याने केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी चैताली उरकुडे, पल्लवी झगझाप व विद्यार्थांनी यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यात.