भक्तांच्या मांदियाळीत श्री जैताई देवस्थानात नवरात्रोत्सव आरंभ
बहुगुणी डेस्क, वणीः येथील प्राचीन जैताई देवस्थान हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. येथे 10 तारखेपासून नवरात्रोत्सव थाटात आरंभ झाला. केवळ शहरच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी मंदिरात आपली हजेरी लावली. दिवसेंदिवस भक्तांची संख्या ही वाढतीच आहे.
फार पूर्वी 1969 पर्यंत हे मंदिर जंगली भागातच होते. त्यामुळे या परिसरात नवरात्रीषिवाय कुणी भटकत नसे. गुलाब बाकडे, मधुकर तालकवार हे त्याकाळात नवरात्रोत्सव करीत असत. पुढे नानासाहेब दामले, वणीचे गावपाटील सांबशिव पाटील, प्रयागदास नरसिंगदासचे मुनीम मथुरादास, हरिदास अदाणी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रयत्न पहिल्यांदा केला.
वणीला राम शेवाळकर प्राचार्य म्हणून रुजू झालेत. त्यांनी प्राध्यापक, विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना सोबत घेतले. जैताई मंदिर परिसरात त्यांनी श्रमदान केले. श्रमदान व लोकसहभागातून मंदिराच्या जीणोद्धाराची प्रक्रिया सुरू झाली. प्राचार्य राम शेवाळकर आणि तेव्हाचे मंदिराचे कार्यवाह नानाजी भागवत व तत्कालीन संचालक मंडळाने मंदिरात अनेक विकासकामे केलीत. तेव्हाचे आमदार वामनराव कासावार यांच्या आमदारनिधीतून सभागृह व विविध कामे झालीत. म. ता. राजुरकर आणि बुवाजी आसुटकर यांच्या देणगीतून दोन अतिथीगृह बांधण्यात आलीत. विजयाताई शेवाळकर यांच्या देणगीतून कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर बालोद्यान तयार झाले. पुढे चालून प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठ आकारास आले.
जैताई देवस्थान वर्षभर विविध समाजपयोगी उपक्रम राबविते. वणीतील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी रोज सायंकाळी मोफत जेवणाची व्यवस्था मंदिर करते. समर्पित मातृशक्तीच्या सन्मानार्थ 2009 पासून ‘‘श्री जैताई मातृगौरव पुरस्कार’’ सुरू केला. आतापर्यंत हा पुरस्कार साधना आमटे, सिंधूताई सपकाळ, डॉ. राणी बंग, डॉ. स्मिता कोल्हे, अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांना प्रदान करण्यात आला. 2018चा पुरस्कार अॅड. पारोमिता गोस्वामी यांना देण्यात येणार आहे. मंदिरात दरवर्षी दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीला पहाट कीर्तन नियमित होत असते. या व्यतिरिक्त व्याख्यान, प्रवचन, कार्यशाळा, नियमित योगवर्ग असे उपक्रम वर्षभर सुरूच असतात.
श्री जैताई देवस्थान समितीचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला आणि समितीमधील माधव सरपटवार, भवनीशंकर पाराशर, प्रा. अरुण माधमशेट्टीवार, मनोहर बाकडे, मुन्नालाल तुगनायत, चंद्रकांत अणे, किशोर साठे, अंजली भागवत, सुधाकर पुराणिक, आशुतोष शेवाळकर हे संचालक मंडळ विविध धर्मिक व सामाजिक उपक्रम घेत आहेत. श्री जैताई अन्नछत्र समितीचे गुलाब खुसपुरे, मुलचंद जोशी, नामदेव पारखी, देवानंद पोद्दार, प्रशांत महाजन, लक्ष्मण बोदाडकर, राजा जयस्वाल, दिवाण फेरवाणी, प्रकाश परांडे, वाल्मिक बावणे, गुलाब निते आदी आपली सेवा चोख बजावत आहेत.
यंदा नवरात्रात 12 व 13 ऑक्टोबरला रात्री आठ वाजता बीड येथील युवा कीर्तनकार ऋतुपर्ण रामदासी यांचे कीर्तन होईल. 14 ऑक्टोबरला अॅड. पारोमिता गोस्वामी यांना 10 वा जैताई मातृगौरव पुरस्कार प्रदान होत आहे. 15 ऑक्टोबर ला ‘‘स्वर आले जुळूनी’’ हा सुधीर फडके यांच्या सुमधुर गीतांचा नजराणा सादर होईल. 16 ऑक्टोबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या रचनांवर आधारीत संगीत कार्यक्रम ‘‘तुकड्या म्हणे’’ होईल. हे कार्यक्रम नागपूर येथील ब्रह्मचैतन्य स्वरोत्सव सादर करतील.