लाठीकाठीचे ‘वस्ताद’ जनार्धन भरणे यांचे वृद्धापकाळाने निधन

राजूर कॉलरी येथे दुपारी 1 वाजता होणार अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील जनार्धन भरणे यांचे दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज गुरुवारी दुपारी 1 वाजता राजूर कॉलरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते उत्कृष्ट लाठीकाठी खेळाडू होते. याशिवाय त्यांनी अनेकांना लाठीकाठीचे प्रशिक्षणही दिले. परिसरात त्यांची ‘वस्ताद’ नावाने देखील ओळख होती.

जनार्धन हे मुळचे मारेगाव तालुक्यातील आकापूर येथील रहिवाशी होते. सुमारे 50-55 वर्षांपूर्वी ते राजूर कॉलरी येथे स्थायिक झाले. ते एक शेतकरी होते तसेच त्यांचा विट कारखानाही होता. लाठीकाठी या मर्दाणी खेळाची त्यांना विशेष आवड होती. परिसरातील ते एक उत्कृष्ट लाठीकाठी खेळाडू  म्हणून प्रसिद्ध होते. 

70-80 च्या दशकात राजूर येथील बलभीम आखाड्याच्या माध्यमातून राजूर कॉलरी येथे मोठ्या प्रमाणात मर्दाणी खेळाचे प्रशिक्षण दिले जात होते. सण उत्सवाच्या दिवशी ते व त्यांच्या विद्यार्थ्यांचे लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सर्वांचेच लक्ष वेधून घ्यायचे. मात्र 90 च्या दशकात शासकीय निर्बंध तसेच मर्दाणी खेळाकडे लोकांचा कल कमी झाला व आखाडा बंद झाला.

शेकडो विद्यार्थ्यांना जनार्धन भरणे व त्यांचे लहान बंधू कालकथित हिरामन भरणे यांनी प्रशिक्षण दिले. जनार्धन यांच्यावर आज दुपारी 1 वाजता गावातील स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जनार्धन यांच्यावर त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंद असा आप्त परिवार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.