जम्बो पक्ष प्रवेशाने काँग्रेसमधली मरगळ दूर होणार ?

बडे नेते, पदाधिकारीसह सुमारे 5000 कार्यकर्ते प्रवेश करणार !

जितेंद्र कोठारी, वणी: नुकतेच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याचे जाहीर केले. मात्र ते केवळ एकटे पक्ष प्रवेश करत नसून वणी विधानसभा क्षेत्रातील सुमारे 5000 कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. यात वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिका-यांचा समावेश आहे. अशी घटना वणीच्या राजकारणात पहिल्यांदाच घडत आहे. या जम्बो पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडणे सहाजिक आहे. मारेगाव येथील निवडणूक झाल्यानंतर ते सर्व काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

विशेष म्हणजे येत्या काही दिवसातच नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश होणार असल्याने याचा काँग्रेसला निश्चितच फायदा होणार आहे. तर दुसरीकडे दुस-या पक्षातून अनेक तरुण नेते, ज्येष्ठ नेते काँग्रेसमध्ये येत असताना स्थानिक काँग्रेसचे नेते हे अद्यापही इनॅक्टिव्ह असून ते अद्यापही काँग्रेसच्या परंपरागत मतांवरच अवलंबून आहेत. त्यामुळे नवीन कार्यकर्ते व पदाधिका-यांच्या लाटेमुळे काँग्रेसला आलेली मरगळ दूर होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाच वर्ष काँग्रेस सत्तेबाहेर होती. त्याच वेळी खासदार, आमदार, नगराध्यक्ष हे तिन्ही पद भाजपकडे होती. शिवाय केंद्रासह राज्यातही भाजपची सत्ता होती. याचा नेमका फायदा उचलत भाजपने परिसरात सर्वांगीन विकासकामाचा धडाका लावला. त्याला खासदार बाळू धानोरकर यांनी खिंडार पाडले. बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा पराभव केला. अहिर यांचा पराभव झाला असला तरी त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत विकासकामांच्या मुद्यावर जनतेनी पुन्हा संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. मात्र त्याच वेळी भाजपची राज्याची सत्ता गेली. खासदारकी आणि राज्यातील सत्ता गेल्याचा मोठा फटका भाजपला बसला व त्याचा काही प्रमाणात परिणाम शहरातील विकासकामांवर झाला. गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही मोठे विकासकामे झाले नसल्याचा आरोप विरोधक करीत असतात.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जरी इनॅक्टिव्ह राहत असले तरी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांनी स्थानिक पातळीवरची धुरा खांद्यावर घेऊन काही प्रमाणात काँग्रेसमधली मरगळ दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी अनेक तरुण नेत्यांना पक्षात आणले. प्रसंगी भाजपचे नगरसेवकही फोडून त्यांना पक्षात आणले. मात्र त्यांना केवळ मोजक्याच कार्यकर्त्यांची साथ मिळताना दिसत आहे. त्यामुळे नगरपालिकेसाठी काँग्रेस अद्यापही एक कमकुवत विरोधी पक्ष ठरत आहे. शिवाय इतरांची साथ मिळल्याशिवाय नगरपालिका काबिज करणेही अशक्य आहे.

स्थानिक पातळीवरचे कोणतेही मोठे आंदोलन नाही
पाच वर्ष काँग्रेस सत्तेबाहेर होता व राज्यात भाजपची सत्ता आली. मात्र दरम्यानच्या काळात कोणतेही मोठे आंदोलन काँग्रेसच्या नेत्यांकडून केले गेले नाही. नगरपालिकेची तयारी करतानाही शहरात मोठ्या प्रमाणात समस्या असतानाही स्थानिक पातळीवरचेही कोणतेही आंदोलन काँग्रेसतर्फे केले गेले नाही. अलिकडे केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राज्य पातळीवरचे आंदोलन काँग्रेसतर्फे करण्यात आले. त्यामुळे याही वेळी केवळ पारंपरिक मतांच्या भरवश्यावरच राहणार का असाही प्रश्न यामुळे उपस्थित होतोय.

डॉ. महेंद्र लोढा यांची धडाडीचे नेते म्हणून एक ओळख आहे. गावखेड्यात त्यांनी रस्ते, पूल, बोअरवेल, वॉटर प्युरिफायर इत्यादींचे काम लोकसहभागातून केले होते. शिवाय आदिवासींच्या हक्कासाठी त्यांनी 2 दिवशीय यात्रा देखील काढली होती. मारेगाव आणि झरी तालुक्यातही त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षाची शाखा स्थापन केली. नवीन कार्यकर्ते घडवले. काँग्रेसमध्येही अनेक चांगले नेते आहेत. मात्र त्यातील बोटावर मोजण्याइतके नेते किंवा पदाधिकारी सोडले तर अधिकाधिक नेते व पदाधिकारी हे इनॅक्टिव्ह आहे. काँग्रेसमधील ऍक्टिव्ह असणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डॉ. लोढा आणि त्यांच्या सह येणा-या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची साथ मिळाल्यास काँग्रेसला याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. मात्र दुसरे कुणी डोईजड होणार म्हणून आधीच पत्ता कट करण्याची निती काँग्रेसमधल्या नेत्यांना सोडावी लागेल. 

महिला आघाडी भाजपच्या वाटेवर?
एकीकडे 5 हजार कार्यकर्त्यांसह डॉ. महेंद्र लोढा हे पक्ष प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीची महिला विंग मात्र तिकीटच्या मुद्यावर वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. महिला विंग गेल्या अनेक दिवसांपासून आगामी नगरपालिका निवडणुकीची तयारी करीत आहे. जर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना प्रथम तिथे आधीपासून इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा तिकीटसाठी सामना करावा लागेल. तिकीटसाठी प्रतिस्पर्धी वाढल्याने महिला विंगच्या इच्छूक कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली आहे. जर तिकीट मिळणार नसेल तर काँग्रेसमध्ये प्रवेश करून फायदा नाही अशी त्यांची भूमिका आहे. या कारणाने काही इच्छुक कार्यकर्त्या या भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

जम्बो पक्ष प्रवेशाचा फायदा घेण्यासाठी इतर पक्षातील नेते ही कामाला लागले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षात यावे यासाठी इतर पक्षातील नेते हे गळ टाकून आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक गावखेड्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ते संपर्कात आहे. त्यामुळे यातील किती लोक डॉ. लोढा यांच्या सोबत काँग्रेसमध्ये जातात. किंवा राष्ट्रवादीच पुढे चालवतात की इतर पक्षाचा मार्ग निवडतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

हे देखील वाचा:

लग्नाच्या आमिषाने आधी शरीरसंबंध, नंतर लग्न करण्यास टाळाटाळ

मैत्रिणीनेच केला विश्वासघात, दुष्कर्मासाठी आरोपीला दिली साथ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.