पुरुषोत्तम नवघरे, वणी: “भीमानं माय सोन्यानं भरली ओटी” या गितातून संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेल्या लोकगायिका कडूबाई खरात यांचा भीम व बुद्ध गितांचा कार्यक्रम वणीत रंगणार आहे. शासकीय मैदान येथे संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कोण आहेत कडूबाई खरात?
कडूबाई या भीम व बुद्धगीत गाऊन समाजप्रबोधन व आपला उदरनिर्वाह करायच्या. 2018 मध्ये छ. संभाजी नगर येथे त्यांनी गायलेले सोन्यानं भरली ओटी हे गाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल झाले होते. तेव्हापासून त्या चर्चेत आल्या. “भीमानं माय सोन्यानं भरली ओटी”, “तुम्ही खाता त्या भाकरीवर”, “कुंकू लाविलं रमानं”, “आमचा मास्तर शिकवतो” ही त्यांनी गायिलेली काही लोकप्रिय भीमगीते आहेत. सध्या त्या ठिकठिकाणी भीम, बुद्ध गितांचे स्टेज शो करून प्रबोधन करतात. त्यांचा कार्यक्रम म्हणजे वणीकर प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणीचे अध्यक्ष संजय तेलंग, उपाध्यक्ष रामदास कांबळे, घनश्याम पाटील, सचिव घनश्याम ठमके, सहसचिव रमेश तेलंग, कोषाध्यक्ष बंडू कांबळे व सर्व सदस्यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विचारमंचाचे सदस्य परिश्रम घेत आहे.
Comments are closed.