‘गझल कौमुदी’: उत्सव गझलांचा बहरणार

कलीम खान यांच्या गझलसंग्रहाचं रविवारी प्रकाशन, प्रकट मुलाखत आणि मुशायरा

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती : ‘गझल कौमुदी’ या मराठी गझलसंग्रहाचं प्रकाशन रविवारी होत आहे. आर्णी येथील सेवानिवृत्त प्राचार्य कलीम खान यांच्या संग्रहाच्या नावातील ‘कौमुदी’हा शब्दच मुळात वेधक आहे. स्वतः गझलकार कलीम खान यांनी या शीर्षकाचा खुलासा त्यांच्या मनोगतात दिला आहे. चांदणे, उत्सव, समीक्षा आणि सिद्धांत असे ‘कौमुदी’चे चार अर्थ सांगितले आहेत. कलीम खान यांचा हा गझलसंग्रह या चारही अर्थांना पुरेपूर न्याय देतो.

शब्द साहित्य मंडळाचे प्रकाशक संजय सिंगलवार यांनीदेखील रसिक वाचकांच्या हाती प्रत्यक्ष संग्रह देताना बरीच काळजी घेतली आहे. मुखपृष्ठदेखील संजय यांचच आहे. शब्द परिवाराने 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळील कॉलेज ऑफ बायोइंजिनिअरिंग अॅण्ड रीसर्च सेंटर येथे हा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. आमदार ख्वाजा बेग, कवी मिर्झा रफी अहमद बेग, कवी बबन सराडकर, गझल अभ्यासक नाना लोडम, लेखिका रजिया सुलताना, कोबार्कचे संस्थापक विजय राऊत आणि मान्यवरांच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन होईल. यानिमित्त होणारा मुशायरा आणि अनंत नांदुरकर घेणार असलेली कलीम खान यांची प्रकट मुलाखत हे या सोहळ्याचं आकर्षण राहणार आहे.

कलीम खान कवी आणि गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे ‘दोहे’ अत्यंत लोकप्रिय आहेत. ‘कलीमच्या कविता’ आणि ‘कलीम के दोहे’ हे त्यांचे संग्रह रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. हिंदी, मराठी, उर्दू, इंग्रजी, संस्कृत या भाषा त्यांना अवगत आहेत. तसेच अनेक धर्माचा त्यांचा अभ्यास त्यांच्या गझलांमधून आपल्याला पाहायला मिळतो. विविध आशय आणि विषयांनी समृद्ध असा हा गझलसंग्रह आहे.

हिंदीतील दोहा, इंग्रजीतील कपलेट हे दोन ओळीत असतात. त्यातही कपलेट हे मीटरमधेच लिहिले जावेत असा पायंडा आहे. मराठीत गझल ही अरबी, फार्शी, उर्दू या परंपरेतून आलेली आहे. हिलादेखील एक ठरावीक आकृतीबंध असतो. मराठीतील व्योमगंगा, वियदगंगा, देवप्रिया, मेनका आदी छंदामधील अनेक रचना आपल्याला या संग्रहात वाचायला मिळतील. छंदांत बांधलेल्या असूनही गझलांमधे शब्द किंवा आशयांची ओढाताण होताना दिसत नाही. अगदी सहजतेने त्या रसिकांच्या काळजाला भिडतात. कलीम खान यांचा व्यासंग, वाचन, निरीक्षण याचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या गझलांमधून पाहायला मिळतं. विविधांगी आशय-विषयांनी त्यांची गझल श्रीमंत होत जाते.

कलीम खान यांच्या गझलेतील प्रतीकं आपल्या भोवती वावरणारीच आहेत. प्रेषित मुहम्मद, राधा, कृष्ण यांचे संदर्भ अगदी सहजरीत्या त्यांच्या गझलांमधून येतात. सुरेश भटांनी मराठी गझल सोपी आणि रसिकाभिमुख केली. शब्दबंबाळ करणाऱ्या रचनांमधून त्यांनी रसिकांची सुटका केली. हृदयाचा हृदयाशी संवाद व्हावा इतकी सरळ रचना असावी असाही त्यांचा आग्रह असायचा. कलीम खान यांची गझल रसिकांसोबत थेट संवाद साधते. यात क्लिष्ट शब्दांचं अवडंबर नाही. कलीम खान यांची मातृभाषा मराठी नाही. तरी त्यांची मराठी गझल याच मातीचा सुगंध घेऊन येते. मराठीचा गौरव करताना ते म्हणतात, ‘‘जरी मातृभाषा मराठी न माझी, उभ्या जीवनाची कहाणी मराठी’’. त्यांची ‘दान दे’ ही गझल जणू एक पसायदानच आहे. त्यातील प्रतीकंही विश्वात्मकच आहेत.

माझा मुहम्मद वेगळा,
त्याची फकीरी शान दे
कृष्णत्व मज देऊ नको
पण अर्जुनाचे कान दे

शृंगार, रोमान्स, सोशल टच, अध्यात्म, सामाजिक जाणीव, जगणं, संघर्ष, आशावाद आदी अनेक विषय कलीम खान यांच्या गझलांमधून अगदी सहज आले आहेत. या अनेक विषयांचा बेस हा ‘माणूस’ आहे. याच माणसाची एक सहज व्याख्या त्यांनी ‘माणसा’ या गझलेतून केली आहे. ते म्हणतात, ‘‘वागतो माणसांशी इथे, जो कोणी माणसासारखा, ऐक माझ्या मते या जगी, तोच माणुस भल्या माणसा’’. मानवी आयुष्य हा ‘मनाचाच गुंता’ आहे. या मनावर भाष्य करणारी ‘नव्या मनाचे श्लोक’ ही एका वेगळ्या धाटणीची गझल आहे. यात त्यांनी वापरलेलं क्रिकेटचं प्रतीक भाव खाऊन जाते. यात ते म्हणतात, ‘‘दररोज बदलत्या पीचवरी, वेगात विकेट जरी पडल्या, निश्चिंत अकंपित धैर्याने, शेवटचे शटकही खेळावे.’’

गझलेचं वृत्तशास्त्र आणि रुबाई परिशिष्टात दिलं आहेत. जवळपास 40 पृष्ठांमधून अगदी सोप्या शब्दांत गझलेचं टेक्निक या संग्रहात मांडल आहे. नव्याने लिहिणाऱ्यांसाठी आणि रसिकांसाठी नक्कीच उपयुक्त असं ठरणार आहे. कलीम खान हे ‘शब्द’ परिवाराचे सदस्य आहेत. बॅंकॉक येथे झालेल्या पहिल्या शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. संग्रहाच्या नावाप्रमाणेच ‘गझल कौमुदी’ हा संग्रह गझलांचा संग्रहच ठरेल अशी आशा गझल रसिकांना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.