आत्महत्या हा उपाय नाही – हभप सोनानदादा कनेरकर

मारेगाव येथे कनेरकर यांचे शेतकरी आत्महत्या विषयावर व्याख्यान

भास्कर राऊत, मारेगाव: आज शेतकरी कर्जाच्या खाईत बुडालेला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे शासनाची मदत हवी तशी मिळत नाही. अशा गंभीर अवस्थेत अडकलेला आमचा मायबाप हा कर्जाच्या खाईत आकंठ बुडालेला असताना मग तो आत्महत्येसारखा पर्याय निवडतो. पण आत्महत्या हा यावरील पर्याय नाही असे मत ह.भ.प. सोपानदादा कनेरकर यांनी व्यक्त केले. ते मारेगाव येथील नगरपंचायतच्या प्रांगणावर आयोजित शेतकरी आत्महत्या कशा थांबवल्या जातील या विषयातील व्याख्यानात बोलत होते. क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघ यांचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश खुराणा, जनहित कल्याण संघटना मारेगावचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा,प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मनिष मस्की, तहसीलदार दीपक पुंडे, ठाणेदार राजेश पुरी, माजी जि. प. सभापती अरुणा खंडाळकर, माजी जि. प. सदस्य अनिल देरकर, माजी प्राचार्य भास्कर धानफुले, नगरसेवक नंदेश्वर आसूटकर, अनिल गेडाम, क्रांती युवा संघटना वणीचे अध्यक्ष सूरज महारतळे, अंकुश माफूर, रवी धानोरकर, राजू गव्हाणे, आयुष ठाकरे उपस्थित होते.

स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कनेरकर महाराज पुढे म्हणाले की, आत्महत्या करणे म्हणजे आपल्या जबाबदारीतुन पळून जाणे होय. जे आईवडील आपल्यासाठी झटले, ज्यांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत आपले आयुष्य खर्ची घातले त्यांच्या उपकाराची परतफेड आपण आत्महत्या करून फेडणार आहात का? या बळीराजाला सगळेच जण चिरडण्याचा प्रयत्न करतात.

निसर्ग साथ देत नाही. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. आण शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी कधीही नसते. त्यांनी कधीही शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळेल यासाठी प्रयत्न केले नाही. फक्त आपल्या सोयीचे राजकारण करण्याचे काम राजकीय पक्ष तसेच स्वार्थी नेत्यांनी केले. त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याचे कार्य केले.

आरोग्यसेवा देणा-यांचा सत्कार
कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथील वैद्यकीय अधिकारी प्रिया वानखडे यांचा कविता मडावी यांनी, परिचारिका नीता कोवे यांचा पिंकी खामणकर यांच्या हस्ते, परिचारिका इंगोले यांचा मीना दिघाडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर आरोग्यदूत प्रफुल उरकुडे, समीर कुळमेथे, आणि रॉयल सय्यद यांचाही शाल व श्रीफळ देऊन उत्कृष्ठ कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी व्याख्यान ऐकायला मारेगाव तसेच परिसरातून नागरिकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केलेली होती. कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत यांनी, प्रास्ताविक सुमित हेपट यांनी तर आभारप्रदर्शन माणिक कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघटना यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.