धडक दिल्याचा संशय असलेला ट्रक ताब्यात

बुधवारी रात्री निर्गुडा नदीवरील पुलावरून कोसळला होता ट्रक

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळल्या प्रकरणी पोलिसांनी एक ट्रक ताब्यात घेतला आहे. या ट्रकच्या धडकेमुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक कठडे तोडून खाली कोसळल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. या अपघातात चालक वैभव महादेव गानफाडे यांचा जागीच मृत्यू झाला होता. ट्रकच्या धडकेमुळे अपघात झाल्याची शक्यता ‘वणी बहुगुणी’ने वर्तवली होती.

सविस्तर घटना अशी की वैभव महादेव गानफाडे (26) हा विठ्ठलवाडी येथील रहिवाशी होता. तो गेल्या 6-7 वर्षांपासून चालक मालक पद्धतीने घरचा हायवा (ट्रक) चालवायचा. गेल्या काही वर्षांपासून त्याचे अडेगाव येथील डोलोमाईट कम्पनीत काम सुरू होते. तेथून घेतलेले डोलोमाईटची तो बाहेर गावी पोहोचवायचा. बुधवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी रात्री तो नेहमीप्रमाणे ट्रक घेऊन अडेगाव येथे जात होता. 

रात्री 10 वाजताच्या सुमारास मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलावर वैभवच्या ट्रकला एका ट्रकची धडक बसली होती. त्यामुळे वैभवचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक पुलाच्या उजव्या बाजूचे (रेल्वे पुलाच्या बाजूने) कठडे तोडत पुलावरून थेट नदीत कोसळला. चालकाची बाजू नदीतील पाण्यात फसल्याने चालकाला बाहेर निघता आले नाही.

अपघात झाल्यानंतर काही वेळातर या मार्गावरून जाणा-या प्रवाशांना पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता त्यांना अपघात होऊन ट्रक नदीत कोसळल्याचे दिसून आले. काही लोकांची तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते.

पूर परिस्थितीमुळे यवतमाळ येथील शोध व बचाव पथक तालुक्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच सकाळी 8 वाजता हे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेन देखील बोलावण्यात आली. सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास अथक परिश्रमानंतर बचाव पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या प्रकरणी आता एक ट्रक ताब्यात घेण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास जमादार दिगांबर किनाके करीत आहे.

Comments are closed.