जब्बार चीनी, वणी: राजूर येथील रहिवाशी असलेले व परिसरात कराटे मास्टर म्हणून प्रसिद्ध असणारे सुनील कोमलवार यांचे यवतमाळ येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात ते यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र रविवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी कराट्याचे प्रशिक्षण दिले. याशिवाय राजूरमध्ये त्यांचा धार्मिक कार्यातही मोठा सहभाग होता.
सुनील कोमलवार हे प्रगतिनगर येथे वेकोलित कार्यरत होते. याशिवाय त्यांना कराटे या खेळाचाही छंद होता. कुंग फु या प्रकारात ते ब्लॅक बेल्ट होते. राजूर येथे ते व त्यांच्या काही सहका-यांनी एकत्र येत कुंग फु कराटे प्रशिक्षण संस्था सुरू केली होती. त्याद्वारे त्यांनी परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना कराट्याचे प्रशिक्षण दिले होते. गणतंत्र दिनाला वणीतील शासकीय मैदानावरील होणा-या कार्यक्रमात त्यांच्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे कराट्याचे प्रात्यशिक हे विशेष आकर्षण ॊअसायचे.
धार्मिक क्षेत्रातही ते कार्यरत होते. फ्री मेथोडिस्ट चर्च राजूरचे सदस्य होते. राजूर येथील जादूगर तेजा यांच्या मृत्यूला एक दिवस लोटला नसताना आज सुनील कोमलवार यांच्या निधनाची वार्ता राजूरवासियांना मिळाली. कोमलवार निधनाने राजुर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व दोन मुली, भाऊ, बहिण, आई असा आप्त परिवार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर आज यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)