ज्याच्या पाठिशी स्त्रीशक्ती, विजय त्याचाच – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

एसबी हॉलमध्ये पार पडला महायुतीचा कार्यकर्ता मेळावा

निकेश जिलठे, वणी: गेल्या 10 वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांचे इमाने इतबारे काम करीत आहो. त्यामुळेच पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. यावेळी सर्वसामान्य मतदारांसह स्त्री शक्तीचीही साथ आहे. ज्यांच्या पाठिशी स्त्री शक्ती असते, त्याचे कुणीही वाकडे करू शकत नाही. त्यामुळे यावेळी विजयाची हॅटट्रीक होणार, अशी आशा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केली. आज शुक्रवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी वणीतील एसबी हॉल येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाळ्याला भाजपसह शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) रिपाई (आठवले) गटाचे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. कार्यक्रमात आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोदकुरवार म्हणाले की दर टर्मला माझे मतदान वाढत आहे. मतदारसंघातील काम घेऊन येणा-या प्रत्येक व्यक्तीचे कायम काम केले. हे काम करताना जात, धर्म, पक्ष कधीही पाहिला नाही. त्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये माझी प्रतिमा चांगली आहे. हीच माझ्या कार्यकाळातील कमाई आहे. यावेळीही अपेक्षा भंग होणार नाही याची मी खात्री देतो. गेल्या वेळी 27 हजारांची लीड मिळाली होती. ही लीड यावेळी दुप्पट होणार, असा विश्वास त्यांनी मनोगतात व्यक्त केला. यावेळी संधी मिळाल्यास वणी विधानसभेला आदर्श विधानसभा करणार, असा मानस देखील त्यांनी व्यक्त केला.

मंचावर दिनकर पावडे, रवि बेलूरकर, विजय चोरडिया, विनोद मोहितकर, विजय पिदूरकर, आशिष मोहितकर, अभिनव भास्करवार, ललित लांजेवार, महादेव खाडे, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, मोबीन, वर्सुकेत पाटील, श्रीकांत पोटदुखे इत्यादींसह महिला मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना बुथ लेव्हलवर काम करून यावेळी मोठ्या लीडने संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवडून आणण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

सोमवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
आपल्या भाषणात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले. यावेळी विरोधकांच्या मनात धडकी भरेल असे अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिंपळशेंडे यांनी केले तर संचालन श्रीकांत पोटदुखे यांनी केले. मेळाव्याला भाजपसह महायुतीच्या घटकपक्षाचे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed.