कवडशीची सुवर्णकन्या त्रिशा काकडे जिल्हास्तरावर झेपावली
योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक, प्रफुल टोंगेने रौप्यपदक मिळवले
पुरुषोत्तम नवघरे, वणी : खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती वणी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा सामने शासकीय मैदान वणी येथे उत्साहात पार पडले. योगासने या क्रीडा प्रकारात जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा कवडशी येथील कुमारी त्रिशा नागोबा काकडे हिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या यशामुळे ती जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. याच शाळेचा भूषण प्रफुल टोंगे यानेही उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. जिल्हास्तरावर झेप घेणारी कवडशी ही नायगाव केंद्रातील एकमेव शाळा ठरली आहे.

शाळेचे मार्गदर्शक व मुख्याध्यापक श्री संतोष आसुटकर यांनी मागील सलग पाच वर्षांपासून या क्रीडा प्रकारात जिल्ह्यावर प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या जुन्या शाळेतील विद्यार्थ्याने मागील वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बदली कवडशी येथे झाली असून ते एकटेच कार्यरत आहेत. त्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व क्रीडा प्रकारात लक्षणीय बदल घडवून आणला आहे. बदलीच्या वेळी जुन्या शाळेतील गावकरी अक्षरशः अश्रू ढाळत होते, हे विशेष उल्लेखनीय आहे.

कवडशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर झेप घेताच गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नागोबा काकडे, उपाध्यक्ष श्री संदीप इंगोले, विवेक काकडे, माधव गाताडे, हरिदास भेंडाळे, सुनील बुच्चे, मयुरी टेकाम, अश्विनी मांढरे, माधुरी येटे, रेश्मा वासेकर, मनीषा बूच्चे, छाया चिडे, माजी अध्यक्ष प्रशांत चिव्हाने, अविनाश देवतळे ग्रामपंचायत सदस्य तसेच समस्त गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कवडशीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश गावाच्या अभिमानात भर घालणारे ठरले आहे.



Comments are closed.