टोंगळाभर खड्यात गेला वेगावं – केगाव रस्ता

गावकरी नि शेतकरी भोगत आहेत नरकयातना

0

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील वेगाव ते केगाव कडे जाणारा रस्ताची वाट लागली आहे. रस्त्यात मोठमोठाले टोंगळाभर खड्डे पडलेत. रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. रस्त्यावरून बैलबंडी तर सोडाच दुचाकी घेऊन जाणेसुध्दा दुरापस्त झाले. यामुळे दोन्ही गावांतील शेतकरी व ग्रामस्थांना या रस्त्याने जाता येता नरकयातना भोगाव्या लागत आहेत. मात्र यावर लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

पाच वर्षांपूर्वी वेगाव ते केगाव जोडणारा 3 ते 4 की.मी.चा रस्ता निर्माण करण्यात आला. परंतु सदर रस्त्याचे काम वेगावं येथील जिल्हा परिषद शाळेपासून ते एक कि.मी.अंतरावर असलेले जेणेकर यांच्या शेतापर्यंतच रस्त्याचे डांबरीकरण झाले. उर्वरित रस्त्याचे अर्धवट काम तसेच ठेवण्यात आले.

यामुळे समोरील रस्त्यावर मोठमोठाले टोंगळाभर खड्डे पडून रस्त्याची वाट लागली आहे. रस्ता पुरता निकामी झाल्याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या शेतकरी बांधवाना कमालीची कसरत करावी लागत आहे. दरम्यान अनेक शेतकरी अपघातांपासून बचावलेत. एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच यांना जाग येईल का? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे हा अवघा रस्ताच खड्यात गेल्याचे ग्रामस्थांना अनुभवास मिळत आहे.

यावर लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष द्यावे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा. या आशयाची मागणी नामदेवराव जेणेकर, संजय बोकडे, गजानन टोंगे, सुशांत ढेंगळे, लक्ष्मण ठावरी, प्रकाश टोंगे, राजू बोकडे, रमेश ढेंगळे, विशाल डोये आदींनी केली आहे. अन्यथा प्रशासनाविरुद्ध तीव्र लढा उभारण्याचा इशारा गिरीश डोये या युवा सामाजिक कार्यकर्त्याने दिला आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.