दारु दुकानाच्या एनओसीसाठी लाखोंची उलाढाल ! कथित व्हायरल क्लिपने खळबळ

मंजुरीसाठी ग्रामसेवक दलालाची भूमिका वठवत असल्याचा महिलांचा आरोप... तर महिला सदस्याचे पती 11 लाखांची मागणी करण्याचा उल्लेख

जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामनी तालुक्यातील मुकूटबन येथे आशिया खंडातील सर्वात मोठा सिमेंट प्रकल्प सुरु होताच या भागात वैध, अवैध व्यावसायिकांनी आपले जाळ पसरविणे सुरु केले आहे. मुकुटबन येथून जवळच गणेशपूर येथे देशी दारुचे दुकान थाटण्यासाठी चक्क लाखों रुपयांची उलाढाल होत असल्याच्या दोन कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दारु दुकानासाठी गणेशपूर(ख.) ग्रामपंचायत कडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरिता ग्रामसेवकच ग्रामपंचायत सदस्यांची मनधरणी करीत असल्याचे कथित ऑडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. दरम्यान या क्पिलमध्ये आशिष खुलसंगे यांच्या नावाचा उल्लेख आल्याने प्रकरण आणखीनच चिघळले. 

प्राप्त माहितीनुसार राज्यात नवीन दारु दुकान उघडण्यास परवानगी नाही. त्यामुळे मुंबई येथील कुर्ला भागातील एक परवानाधारक देशी दारु दुकान गणेशपूर येथे ट्रान्सफर करण्याचे चंद्रपूर जिल्ह्यातील एका मदिरा व्यावसायिकाचे प्रयत्न सुरु आहे. दारु दुकान सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत कडून नाहरकत प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी गणेशपूर (ख.) ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांना आर्थिक प्रलोभन देण्याचे प्रयत्न ग्रामसेवक मार्फत सुरु आहे.

कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
ग्रामपंचायतचे सचिव व महिला ग्रा.पं. सदस्यामध्ये मोबाईल संभाषणची क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये महिला ग्रामपंचायत सदस्य गावात दारु दुकान उघडण्यास कडाडून विरोध करीत आहे. तर दुसऱ्या क्लिपमध्ये त्याच महिला सदस्याचे पती एनओसीच्या मोबदल्यात वाटाघाटी करत 11 लाख रुपये नगद व दारु दुकानाच्या नियोजित जागेच्या बाजूने असलेला त्याचा मालकीचा प्लॉट 650 रुपये चौरसफुट प्रमाणे विकत घेण्याची अट ग्रामसेवकाकडे टाकत आहे.

कथित व्हायरल ऑडिओ संभाषणनुसार गणेशपूर (खडकी) ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंचासह 4 ग्रा.पं. सदस्य गावात देशी दारु दुकान उघडण्यास त्यांच्या अटीवर परवानगी देण्यास तयार आहे. मात्र एका महिला सदस्याची होकार मिळविण्यासाठी ग्रामपंचायत सचिव प्रतीक कापसे त्या महिला सदस्याची व तिच्या पतीदेवकडे विनवणी करीत असल्याचे व्हायरल रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट होत आहे. रेकॉर्डिंग संभाषणात त्या महिला सदस्यांनी माजी सरपंच आशिष खुलसंगे यांनीसुद्धा गावात दारु दुकान सुरु करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत आहे. मात्र गावातील महिलांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा केला आहे. 

माझी बदनामी करणा-यांवर कायदेशीर कारवाई – आशिष खुलसंगे
गणेशपूर(खडकी) ग्रामपंचायतीचा सरपंच असताना मी कधीही दारु विक्रीला कधीही प्रोत्साहन दिलेले नाही. तसेच अवैध दारू विक्रीला देखील थारा दिला नाही. माझ्या कार्यकाळात गावात सुरू असलेली अवैध दारु विक्री पूर्णपणे बंद केली होती. व्हायरल संभाषणात ज्या महिला सदस्यांनी माझ्या नावाचा उल्लेख करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. तसेच व्हायरल ऑडिओ क्लिपवरून ज्यांनी माझ्या नावासह खोट्या बातम्या प्रकाशित केल्या त्या वर्तमानपत्र, न्यूज पोर्टल यांना कायदेशीर नोटीस पाठविणार आहे.
– आशिष खुलसंगे- माजी सरपंच गणेशपूर

Comments are closed.