खासदार बाळू धानोरकर यांचा मुकुटबन येथे सत्कार
खाजगी कंपनीतील तरुण युवकांचा नौकरीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
सुशील ओझा, झरी : गरीब जनतेचा प्रतिनिधी असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. येथील खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून युवकांच्या नोकरीचा प्रश्नही मार्गी लावणार असल्याचे सांगत कुणबी समाज अल्पसंख्याक नाही, असे वक्तव्य खा. बाळू धानोरकर यांनी केले. कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित खा. धानोरकर यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. येथील गुरुदेव सेवा मंडळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी खा. धानोरकर बोलत होते. यावेळी व्यापारी असोसिएशनचे प्रदीप मासिरकर, विजय नांदेकर, सरपंच शंकर लाकडे, कुणबी समाजाचे अध्यक्ष नेताजी पारखी,गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रेमनाथ लोढे, सुनील ढाले व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खा. धानोरकर यांच्या हस्ते मातोश्री कनिष्ठ महाविद्यालयतून प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी सौरव मारोती उपाध्ये, द्वितीय सुचिता सुधाकर राऊत, भारती हितार्थ गुडेकर, लीना सावनकुमार महाजन, पल्लवी बाबाराव सोनटक्के, अनिता गंगारेड्डी जिन्नावार तर दहावीतील अंजली अविनाश पुनवटकर,ओंकार संजय जांभे व पायल जितेंद्र ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेताजी पारखी यांनी केले. राजू विधाते म्हणाले की, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना वीजपुरवठा होत नाही. .
आपल्या भागात वीज निर्मिती होते परंतु याचा फायदा मुंबई, दिल्ली व पश्चिम महाराष्ट्रात होत असल्याचे सांगितले. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत असून, याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. सरपंच शंकर लाकडे यांनी कुणबी समाज अल्पसंख्याक असून विखुरलेला आहे सर्व समाजबांधवानी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. प्रेमनाथ लोंढे व विनोद गोडे यांनीही विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन विपीन वडके यांनी केले. आभार केशव नाखले यांनी मानले. यशस्वीकरिता सुनील ढाले, अनिल पावडे,आनंद गोहणे,विजय पिंपळशेंडेसह समाज बांधव यांनी परिश्रम घेतले..