बहुगुणी डेस्क, वणी: हे शहर मैदान खेळाचे शौकीन आहे. इथे अव्वल दर्जाचे जसे खेळाडू आहेत, तसेच क्रीडाप्रेमीदेशील. वणीला यावर्षी राज्यस्तरीय स्पर्धा झाली. या स्पर्धेला प्रेक्षक व संघांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पुढल्या वर्षी वणीत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेऊन वणीचे मैदान गाजवू. असा शब्द खा. प्रतिभा धानोरकर यांनी वणीकरांना दिला. रविवारी वणीतील शासकीय मैदानावर खासदार चषकाचा बक्षिस वितरण सोहळा झाला. यावेळी त्या बोलत होत्या.

बक्षिस वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष खा. प्रतिभा धानोरकर होत्या. तर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, एसडीपीओ गणेश किंद्रे, तहसिलदार निखील धुळधर, तालुका क्रीडा अधिकारी चैताली राऊत, माधव शिंदे, किशोर गज्जलवार, सचिन गाडे, देविदास काळे, टिकाराम कोंगरे, संजय खाडे, दिलीप मालेकर, घनश्याम पावडे, अलका महाकुलकर, शामा तोटावार, प्रमोद लोणारे, मोरेश्वर पावडे, भाउराव कावडे, जय आबड, वंदना आवारी यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून सोहळ्याला उपस्थिती होती.

पुढं बोलताना खासदार धानोरकर म्हणाल्यात की, स्व. बाळूभाऊ धानोरकर हे क्रीडाप्रेमी होते. ते खासदार असताना त्यांनी वरो-यापासून कबड्डी खेळाचे भव्य सामने घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांचाच कित्ता गिरवत यंदा वणीत कबड्डीचे टुर्नामेंट सुरु करण्यात आले आहे. भविष्यात मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कबड्डी टुर्नामेंट सुरु करण्याचा मानस आहे.
खा. प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून वणीत खासदार चषकाचे आयोजन कऱण्यात आले होते. शुक्रवारी दिनांक 4 एप्रिल ते 6 एप्रिल असा तीन दिवस राज्यस्तरीय कबड्डीचा थरार रंगला. यात मुंबई, नागपूर, बारामती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. मॅटवर खेळण्यात आलेल्या या सामन्यांना प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अंतिम सामना श्रीराम कबड्डी संघ बारामती व द. पू. मध्य रेल्वे नागपूर यांच्यात झाला. यात बारामती संघाने नागपूरच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. तर नागपूरचा संघ उपविजेता ठरला.

तिस-या स्थानासाठी टाकळी येथील संदीप बुरेवार व भारत स्पोर्टिंग क्लब उमरेड यांच्यात लढत झाली. टाकळी येथील संघाने उमरेडच्या संघावर मात करीत तिसरे स्थान पटकावले. तर उमरेडच्या संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला 1 लाख रोख, उपविजेत्या संघाला 71 हजार रोख, तृतिय विजयी संघाला 51 हजार तर चतुर्थ विजयी संघाला 31 हजार रोख बक्षिस देण्यात आले. याशिवाय वैयक्तिक बक्षिसांमध्ये बारामतीचा खेळाडू शुभम दिडवाघ याला उत्कृष्ट ऑलराउंडर, नागपूरचा वंश मुदलीयार याला बेस्ट रायडर, नागपूरचा राहुल कांबळे बेस्ट डिफेन्डर तर बारामतीच्या शुभम गायकवाड हा मॅन ऑद दी सिरीज ठरला.
आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पहापळे व सचिव योगेंद्र शेंडे, प्रवीण काकडे, ओम ठाकूर, पलाश बोढे , मुरलीधर भोयर, सतीश लडके, राजू अंकतवार, नरेश मोरस्कर, गणेश आसुटकर, देवानंद अवताडे, उमेश कुमरे, नरेंद्र सपाट, सुरेश डाहुले यांच्यासह युवा नवरंग क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
Comments are closed.