सुशील ओझा, झरी: मुसळधार पावसामुळे झरी तालुक्यातील खातेरा जाणाऱ्या मार्गावरील पुलावर मातीचा थर जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सतत दोन दिवस पाऊस सुरू असल्याने खातेरा गावाजवळील पुलावरून रात्रभर पाणी वाहत होते. याच पाण्यात आजूबाजूला असलेल्या काळी मातीचा २ फूट थर जमा झाला. त्यामुळे रस्त्यावरून जाणेयेणे कठिण झाले व हा रस्ता बंदच राहिला.
रस्ता बंद झाल्याने खातेरा गावातील जनतेला बाहेर गावी जाणे बंद झाले. तर रस्त्यावरून ऑटो चालणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा देखील बुडाली. पुलावरील चिखलामुळे रस्ता दिसत नव्हता तर चिखलात घसरून पडण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे गावतील 30 शाळकरी मुलामुलींनी घरचा रस्ता धरला.
सदर पूल हा रोडच्या बरोबरोला असून पावसामुळे माती, काडीकचरा रस्त्यावर येऊन साचतो. ज्यामुळे गावकर्यांना जाणे येणे करण्यास त्रास होतो. तरी संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन सदर पुलाची उंची वाढवून जनतेचा त्रास कमी करावा. तसेच पुलावरील साचलेली माती साफ करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी गावक-यांनी केली आहे.