खातेरा गावाजवळ असलेल्या रफट्यावरील चिखलाने गावकरी त्रस्त
दुचाकी व सायकल स्वारकांच्या अपघातात वाढ
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील चंद्रपूर- आदीलाबाद जिल्ह्याच्या टोकावर पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर खातेरा गाव आहे. गावातील जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून जाण्या येण्याकरीता मोठी कसरत करावी लागत होती. परंतु वणी बहुगुणीने पुढाकार घेऊन सतत बातम्यांच्या माध्यमातून शासन व प्रशासनला झोपेतून उठवून काम करण्यास भाग पाडले. आज खातेरा ग्रामवासीयांना गावाच्या बाहेर निघण्याचा मार्ग मोकळा झाला .
खातेरा ग्रामवासियांना दरवर्षी पावसाळ्यात ४ महिने घराबाहेरील रोजची कामे करणे कठीण झाले होते. कारण खातेरा ते अडेगाव मार्गावरील गावाजवळील एका नाल्यावर पावसाळ्यात पाणी साचायचं. नाल्यातील पाईपमध्ये कचरा अडकून पाणी रफाट्यावरून (नाला) वाहायचं. आजूबाजूची सर्व माती रफाट्यावर टोंगळाभर साचत होती. ज्यामुळे सर्व गावकरी तसेच शाळकरी विद्यार्थांनासुद्धा पावसाळ्यात चार महिने शाळेत जाणे कठीण झाले होते .
रफट्यावरील चिखलामुळे स्कूलबस व ऑटोसुद्धा निघणे कठीण झाले होते. अनेकदा स्कूलबस, ऑटो व दुचाकी रफाट्यावरील चिखलात फसल्याने शाळकरी मुला-मुलींना घरी परत जावं लागायचं. ज्यामुळे शाळकरी मुलांचे शैक्षिणक नुकसान होत होते. ग्रामवासीयांना तसेच विद्यार्थांना शिक्षण व इतर खरेदीकरिता मुकुटबन मार्केटमध्ये यावे लागते. परंतु मार्गच बंद राहत असल्याने खरेदी व शिक्षणाकरिता येणे-जाणे बंद राहत होते. ज्यामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
खातेरा ग्रामवासींयाच्या समस्याबाबत वणी बहुगुणीने सतत पाठपुरावा केल्याने लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची झोप उडाली. अखेर अडेगाव -खातेरा मार्गावरील रफाट्याचे काम सुरू झाले. ते पूर्णत्सवास आले व खातेरा ग्रामवासीयांचा प्रश्न मार्गी लागला. गावकऱ्यांना ये-जा करण्यास मार्ग मोकळा झाला.
परंतु गेले ५-६ दिवस सतत पाऊस सुरू असल्याने सदर पुलावरील रस्ता पूर्ण चिखलमय झाला. या रसत्यावरून बैलगाडी, दुचाकी व सायकल जाणे कठीण झाले. रस्त्यावर घसरून अनेकजण पडले. दुचाकीस्वारांचे अपघातही झाले. ज्यामुळे अनेकांना किरकोळ जखमाही झाल्या. तरी सदर रस्त्याची सुधारणा करून मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी खातेरा ग्रामवासीयांकडून होत आहे.