मारेगाव तालुक्यात कापसाच्या खेडा खरेदीला आलाय ऊत

पोडातील व अल्पभूधारक शेतक-यांकडून कमी भावात कापसाची खरेदी

सुरेश पाचभाई, बोटोणी: सध्या जागतिक बाजारपेठेत कापसाचे भाव वाढले आहेत. कापसाच्या दरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चांगली वाढ आहे. त्यामुळे येत्या काळात खासगी बाजारात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र मारेगाव तालुक्यात जिनिंग सुरु होण्याआधीच कापसाच्या खेडा खरेदीला ऊत आला आहे. शेतातून कापूस घरी येताच अनेक विनापरवाना खेडा खरेदीदार बोटोणी परिसरातील जंगल पोड भागातील आदिवासी शेतकऱ्याच्या दारावर पोहचले आहे व त्यांच्याकडून अत्यल्प भावात कापूस खरेदी करून लूट करीत आहे.

परिसरातील बोटोणी, घोगुलदरा, बिहाळीपोड, खेकडवाई, बुरांडा भागात आदिवासी, अशिक्षित व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कापसाच्या जागतिक स्तरावरील दर आणि त्याच्या मागणी बाबत माहिती नसते. नेमका याचा फायदा घेऊन खाजगी खरेदीदार या शेतकऱ्यांकडून 5000 ते 5500 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करत आहे. वणी येथे कापसाचे भाव 6300 रु.दर क्विंटल सुरु आहे.

खेडा खरेदी करणारे काही व्यापारी बाजारभावात किंवा त्यापेक्षाही जास्त भावात शेतकऱ्याच्या घरी जाऊन कापूस खरेदी करतात. मात्र वजनकाट्यात तफावत करून ते शेतकऱ्यांची लूट करतात. अधिक भावात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे लुबाडल्याची अनेक घटनासुद्दा या भागात घडली आहे. खाजगी बाजारात कापसाच्या भावात तेजी असल्यामुळे यंदा शासकीय खरेदी सुरु होण्याची शक्यता कमी आहे.

मारेगाव तालुक्यात अद्याप जिनिंग कारखाने सुरु झाले नाही. दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपले असता बळीराजाला पैशाची गरज भासत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी लवकर सुरू व्हावी अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा:

चारगाव चौकी येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

बारसमोर मद्यधुंद अवस्थेत मित्रांचा राडा, मारहाणीत एकाचा मृत्यू

Comments are closed.