मंगळवारी जैन ले आऊटमध्ये सत्यपाल महाराज यांचे कीर्तन

हरी चैतन्यानंद महाराजांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता शहरातील जैन ले आऊट येथील माऊली मंदिर परिसरात सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

जैन ले आऊटमध्ये रंगले हरी चैतन्यानंद महाराजांचे कीर्तन
भारतीय संस्कृती ही इतिहास किव्हा पुस्तकाच्या पानात नाही तर ती जिवंत उत्सवात आहे. उत्सव साजरे करण्याचे उद्दिष्ट व त्याची पार्श्वभूमी याचे मनन व चिंतन झाले पाहिजे, तरच संस्कृती निर्माण करणाऱ्या ऋषीमुनी, साधुसंत यांच्या समोर मनुष्य कृतज्ञतेने नतमस्तक होईल. तद्वतच नम्रतेने वागून त्याचीजोपासना करण्यातच समस्त मानवाचे हित असल्याचे मत हरिचैतन्यजी महाराज यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ जैन ले आऊट येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना ते बोलत होते.

सकाळी परिसर स्वच्छ्ता करण्यात आली. मनाच्या एकाग्रतेसाठी सामुदायिक ध्यान घेण्यात आले. परिसरातून रामधून व भव्य शोभायात्रा लेझिम पथक व भजनाच्या माध्यमातून काढण्यात आली. ग्रामगीता वाचन घेण्यात आले. ग्रामगीतेवर आधारीत रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात प्रज्वल चरडे. वैशाली वातीले, प्रांजल ठाकरे, आदर्श हायस्कूलचे विशाल राठोड, जिनत शेख, टरफिया शेख या प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना प्रा महादेव खाडे, विजय गंधेवार व म्हसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ग्रामगीता, संविधान पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.

राष्ट्रसंताना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. स्वामीजींच्या हस्ते आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. किर्तन हे सुसंस्कारित पिढी घडविण्याचे वआणि समाज प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट माध्यम असल्याचे मत आमदार साहेबांनी व्यक्त केले. राष्ट्वंदनेनी कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. यशस्वितेसाठी मनोहर झाडे, मारोती मालेकर, दौलत दुर्गे नामदेव तुरानकर, नाना बदखल, गजानन उपासे प्रज्वल नागपुरे, पुरुषोत्तम पानघाटे, अरुण चटप, मधुकर झाडे, पुंडलीक झाडे, सुनिल माथनकर, पांडुरंग पोतराजे व सर्व गुरुदेव उपासक उपसिका यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला शहरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.