चंद्रासोबतच ‘या’ ताऱ्याचंही महत्त्व असतं कोजागरीला
विविध धर्मातही ’नव्याची’ असते कोजागरी पौर्णिमा
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः निसर्ग म्हणजे नवता. प्रत्येक क्षणाक्षणाला निसर्ग काहीना काही नवं देत असतो. पावसाळा संपला की हिवाळा लागतो. अर्थात वर्षा ऋतूनंतर शरद ऋतू येतो. या ऋतूत अनेक नव्या पिंकांच्या कापणीला सुरूवात होते. काही पिकं कापून घरी आलेली असतात.
सगळं काही नवं नवं आलेलं असतं. हे निसर्गाकडून आलेलं नवं, निसर्गालाच अर्पण करण्याचा सोहळा ही पौर्णिमा. ‘तेरा तुझ को अर्पण’ या भावनेतून निसर्गाला आपण काही काहीतरी दिलं पाहिजे. कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. यासाठीच हा कोजागरी पौर्णिमेचा सोहळा.
बौद्ध परंपरेतही अश्विन पौर्णिमेला वर्षावास संपतो. इथून ज्ञानदान आणि जागृतीच्या नव्या कार्याला सुरुवात होते. जैन परंपरेत अश्विन पौर्णिमेला जैन मंदिरात अभिषेक, पूजाविधान, मंत्रजाप होतो. नेरपिंगळाई जैन मंदिराचे पुजारी प्रशांत भागवत यांनी ही माहिती दिली. विविध धर्म अथवा पंथांतून पौर्णिमेला काही विधी, उपक्रम किंवा उत्सव होतात.
हिंदू परंपरेत कोजागिरी पौर्णिमेला शुक्रवारी 30 ऑक्टोबरला लक्ष्मी, इंद्र, कृष्ण, बळीराजा, चंद्र आदी देवतांची पूजा होईल. बौद्ध परंपरतेत या दिवसाला वर्षावासाची समाप्ती होते. जैन आणि महानुभाव परंपरेतही जवळपास सर्वच पौर्णिमांना महत्त्व असतं.
कोजागरी पौर्णिमा ही विविध धार्मिक बाबींशी जुळली आहे. तरीदेखील एक मस्त गेट टुगेदरही या निमित्ताने होतं. अलीकडे दुधासोबत अनेक खाद्यपदर्थांची रेलचेल असते. पुढील चार-पाच दिवसांपर्यंतही हे कोजागरीचं सेलिब्रेशन सुरूच असतं. या कोजागरी पौर्णिमेची विविध लॉजिक्स आहेत. यावर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी खास मतं मांडलीत.
यंदा शुक्रवारी 30 ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा आहे. एरवी ही पौर्णिमा चंद्राशी नातं सांगते. तरीदेखील यादिवशी खगोलातील ‘अगस्त्य’ ताऱ्याच्या तेजाचं महत्त्व असल्याची माहिती विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी दिली. हा नवतेचा सोहळा आहे. यावर विविध तज्ज्ञांनी आपली मते मांडलीत.
या पौर्णिमेसोबतच अनेक धार्मिक संदर्भही दिले जातात. लक्ष्मी या रात्री पृथ्वीवर संचार करत असते, असंही म्हणतात. ती सगळं पाहते. को जागर्ती? म्हणजेच कोण जागं आहे, असं विचारते, असाही एक संदर्भ कोजागरी पौर्णिमेचा सांगितला जातो.
पावसाळ्यातील ढगांची दाटी दूर झाल्याने चंद्र पूर्ण प्रकाशित झालेला दिसतो. चंद्राचं आणि माणसाचं नातं हे आरंभापासूनच आहे. अगदी देवता, भाऊ, मामापासून तो प्रियकरही मानला जातो. चंद्रासोबत आपलं नैसर्गिक नातं जोडण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केलेला आहे.
भारतातील अनेक सण-उत्सव हे निसर्गपूजनातून अथवा कृषिसंस्कृतीतून आलेत. त्यातीलच हा निसर्गाशी पुन्हा आपलं नातं जोडण्याचा सोहळा आहे. अश्विन महिन्यात अनेक कडधान्यं शेतातून घरी आलेली असतात. येत असतात. शेतात अथवा घरासमोर लावलेल्या भाज्यांचंही यावेळी महत्त्व असतं. शरद ऋतू बहरलेला असतो. त्यातील पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. विशेषत: कोकणात ही नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी करतात.
जनकल्याणाचा आरंभ
बौद्ध परंपरेत वर्षावास आषाढी ते अश्विन पौर्णिमेपर्यंत एका विहारात होतो. वर्षावासाची समाप्ती अश्विन पौर्णिमेला होते. दरम्यान चित्तशुद्धीची साधना होते. आत्मपरीक्षण करून प्राप्त केलेल्या ज्ञानाचा जनकल्याणसाठी उपयोग करायचा असतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाने बौद्ध भिख्कू अश्विन पौर्णिमेपासून सत्कार्यासाठी बाहेर पडतात.
प्रा. सुभाष गडलिंग, बौद्धधम्म अभ्यासक
अगस्त्य ताऱ्यासाठी होते कोजागिरी पौर्णिमा
अश्विन पौर्णिमा या काळात आकाशात चंद्राच्या आसपास अगस्ती तारा असतो. या ताऱ्याच्या तेजाचा विषय असतो कोजागरी पौर्णिमा. दक्षिण खगोलार्धातील हा अत्यंत तेजस्वी आणि मुख्य तारा आहे. भारतातून हा तारा क्षितिजाच्या आसपास दिसतो.व्याधनंतर अगस्त्य हा दुसरा सर्वात तेजस्वी तारा आहे. ऑगस्ट ते मे महिन्याच्या काळात हा तारा दक्षिण दिशेकडे दिसतो. अगस्त्य ऋषीच्या नावावरून ह्या ताऱ्याचे नाव पडले असावे. या ताऱ्याच्या तेजाचा लाभ व्हावा म्हणून कोजागरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.
एरवी ही पौर्णिमा चंद्राच्या तेजासाठीच साजरी होते. धर्म, ज्योतिष्य, आयुर्वेदातही चंद्राचं महत्त्व सांगितलं आहे. कोजागिरी पौर्णिमेला केवळ दुधाचेच सेवन करणे अपेक्षित आहे.
प्रा. डॉ. स्वानंद गजानन पुंड, संस्कृतज्ज्ञ
शरदाची पौर्णिमा हा नवतेचा उत्सवशरदाची पौर्णिमा हा नवतेचा उत्सव आहे. शरद ऋतू बहरतो. त्याकाळात पावसाळा संपलेला असतो. आकाश निरभ्र असतं. त्यातील पौर्णिमेला चंद्र अधिक स्पष्ट आणि लख्ख दिसतो. ही शरदाची पौर्णिमा म्हणजेच कोजागरी म्हणून साजरी करतात.
शरद ऋतू हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. पूर्वी शरद ऋतूपासूनच वर्ष मोजलं जायचं. शरद म्हणजे वर्ष असंही ढोबळमानानं म्हटलं जायचं. ‘जीवेत शरद: हा शतम्’ अर्थात शंभर वर्ष जगा असा अर्थ सांगितला जातो. निसर्गही या काळात भरभरून देत असतो.
एव्हाना या वेळेपर्यंत खरिपाची पिकं आलेली असतात. घरात समृद्धी नांदायला सुरुवात होते. चंद्रही पूर्ण असतो. अनेक इच्छांची पूर्तताही यावेळी होते. त्यामुळेच ही पूर्णत्वाचा सोहळा असतो.
डॉ. आ. ह. साळुंखे, प्राच्यविद्या पंडित
माईक्रो मून आणि ब्लू मून
मागील वर्षी 13 ऑक्टोबरला कोजागिरी पौणिमा होती. या वर्षीची पौर्णिमा ही 31 ऑक्टोबरला आहे. हिंदू कॅलेंडरनुसार ही पौर्णिमा शरद ऋतूतील अश्विन पौर्णिमा आहे. याच पौर्णिमेला कोजागरी साजरी केली जाते.
को जागर्ती ह्या संस्कृत शब्दापासून कोजागरी हा शब्द तयार झाला. याचा अर्थ, कोण जागत आहे? असा होतो. प्राचीन मान्यतेनुसार ह्या दिवशी लक्ष्मी चंद्रच्या आभेतून पृथ्वीवर अवतरते आणि जागणाऱ्यांना आशीर्वाद देते आणि वैभव प्राप्त होते अशी आख्यायिका आहे. ह्याच दिवशी श्रीकृष्णाने महारास रचले होते. तर ह्याच दिवशी बळीराजाची पूजा केली जाते.खगोलशास्त्रानुसार चंद्र पृथ्वीपासून अंतर 406347 किमी दूर असेल. ह्यालाच मायक्रो मून असे म्हटले जाते. ह्या एकाच महिन्यात 2 पौर्णिमा आल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून असे संबोधले जाते.
ह्या दिवशी लोक चंद्राचे किरण दुधावर पाडून दूध पितात. परंतु शास्त्रीयदृष्ट्या चंद्रकिरणाचा फारसा परिणाम दुधावर होत नाही. परिणाम होण्यासाठी दुधाला उकळून पिल्याने त्यातील गुणधर्म बदलतात. हिवाळ्यात सर्व पौणिमा ह्या सारख्याच असतात.
प्रा. सुरेश चोपणे, खगोलतज्ज्ञ
16 कलांनी परिपूर्ण असेल आजचा चंद्र
अश्विन, कार्तिक, मार्गर्शीर्ष आणि पौष हा शरद ऋतूचा काळ. सप्टेंबर-ऑक्टोबरपासून अश्विन महिना सहसा सुरू होतो. यंदा अधिकमास आल्याने अश्विन महिना थोडा लेट झाला. शरदाची पौर्णिमा 30 ऑक्टोबरला सायंकाळी 5.45ला लागते. ही कोजागरी पौर्णिमा 31च्या रात्री 8.18पर्यंत आहे.
सूर्य आता तूळ राशीत आहे, म्हणजे त्याच्या नीच राशीत. सोबत बुध आहे, म्हणजे बुध आदित्य राजयोग होत आहे. चराचरात, पण सूर्य निच राशीत असल्याने तो विपरित राजयोग होतो.चन्द्र मेषेत, तर मंगळ मीन राशीत भ्रमण करत आहे. गुरू स्वराशीत म्हणजे धनु आणि शनी स्वराराशीत म्हणजे मकर राशीत भ्रमण करत आहेत.
कोजागरीची रात्र ही 30 मानायची. कोजागरी होणारे जेष्ठ अपत्याचे पूजन 31 ला करावे. ज्यांच्याकडे कुळाचार असतो त्यांनी तो 31ला करावा. ह्या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो. त्यामुळेच इंद्रदेवतेचीदेखील पूजा करावी.
पुढील 15 दिवसांचे राशीफल पुढीलप्रमाणे राहील.मेष- शीतविकार संभवतो, खर्च वाढू शकतो.
वृषभ- मित्रांकडून काही चांगल्या पद्धतीने मदत मिळेल. मिथुन- वडीलधाऱ्या मंडळींना जपणे, काही प्रमाणात व्यवसायवृद्धी. कर्क- भाग्यकारक घटना घडेल. सिंह. आरोग्याला जपणे, ऍलर्जी सर्दी, नेत्र जपणे. कन्या- शत्रूनाश, धनमार्ग प्रशस्त होतील.तूळ. संतती संबंधित शुभसमाचार कळतील. वृश्चिक- आरोग्य जपणे, क्रोधावर नियंत्रण आवश्यक. धनु- पराक्रम वाढेल, शुभता वाढेल, जोडिदाराकडून अपेक्षापूर्ती. मकर- धनमार्ग प्रशस्त होतील, वाणीवर नियंत्रण हवे. कुंभ- खर्च आणि चैनी प्रवृत्ती वाढेल. मीन- धनाचा अपव्यय टाळावा, जोडीदाराला जपावे, वाहन हळू चाललावीत.
किरण काटपाताळ, ज्योतिर्विद
00000000000000000000000000000
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)