4 दिवसानंतरही नरभक्षी वाघ मोकाटच…. नागरिक दहशतीत…

वाघाला जेरबंद करण्यात अद्याप वन विभागाला यश नाही

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कोलेरा येथे शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याच्या घटनेला 4 दिवस उलटून गेले आहे. नरभक्षी वाघाला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाचे 25 ते 30 कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र अद्यापही नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यास वन विभागाला यश मिळाले नाही. दरम्यान वाघाचा वावर असलेल्या गावा सभोवता विद्युत दिवे लावण्याच्या मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत यांना निवेदन दिले आहे. 

उप वन संरक्षक पांढरकवडा किरण जगताप यांच्या नेतृत्वात विविध टीम कोलेरा परिसरात नरभक्षी वाघाचा शोध घेत आहेत. कोलेरा, कोलार पिंपरी व पूनवट गावालगत असलेल्या जंगलात 20 पेक्षा जास्त ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी 2 मोठे पिंजरे आणण्यात आले आहे. वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी ट्रंक्युलायझर गनसह रेस्क्यू पथकसुद्धा तळ ठोकून आहे. मात्र अद्यापही वाघाची हुलकावणी सुरूच आहे.

संपूर्ण वणी उपविभागातच वाघाची दहशत
कोलेरा येथील घटना ताजी असताना तीन दिवसांआधी मुकुटबन जवळील खडकी गावाजवळील एका धाब्यावर वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. शिवाय मारेगाव तालुक्यातील बोटोणी, केगाव, खेकडवाई, गोंडबुरांडा या भागात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण वणी उपविभागच दहशतीत आला आहे. ज्या भागात वाघांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत त्या भागात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.

वाघामुळे नागरिक दहशतीत
पंढरवाड्यात वाघाच्या हल्लात वणी तालुक्यातील दोघांचा जीव गेला आहे. तर ब्राह्मणी परिसरातील एक मजूर गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच दहशतीत आले आहे. निळापूर, ब्राह्मणी, भालर, सुंदरनगर इ. भागात वाघाचे दर्शन होत आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वेकोलि कर्मचारी कामाला जातात. शिवाय या गावातून मोठ्या प्रमाणात नागरिक वणीला येतात व संध्याकाळी गावी परत जातात. वाघाच्या दहशतीचा परिणाम शेतीवरही होताना दिसत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतामध्ये सोयाबिनची कापणी आणि कापसाची वेचणी सुरू आहे. मात्र परिसरात वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्यास धजावत आहे. याचा मोठा फटका कापूस वेचणीला बसत आहे.

Comments are closed.