शिपाई व आशासेविकेची मुलगी होणार MBBS डॉक्टर

प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत वेळाबाईच्या अश्विनीची यशोगाथा.. शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे अश्विनीचा सत्कार....

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वडील एका शाळेत शिपाई पदावर तर आई आशासेविका… कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानाही त्यांच्या मुलींनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. कठोर परिश्रमानंतर आता त्यांच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. ही कहाणी आहे वेळाबाई येथील अश्विनी उमरेची ! अश्विनी लवकरच एमबीबीएस डॉक्टर होणार आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी अश्विनीची मोठी बहिण तेजस्वीनीने  देखील नीट परीक्षेत यश प्राप्त करीत एमबीबीएसला प्रवेश निश्चित केला होता. ती सध्या लातूर येथे शिक्षण घेत आहे. उमरे दाम्पत्याच्या दोन्ही मुली लवकरच डॉक्टर होणार असल्याने त्यांचे परिसरात कौतुक होत आहे. 

वणी तालुक्यातील वेळाबाई येथील भालचंद्र उमरे हे रहिवासी आहे. ते कळमना येथील भास्करराव ताजने विद्यालयात शिपाई पदावर आहे. त्यांच्या पत्नी रेणूताई या आशा स्वयंसेविका आहे. त्यांना तेजस्वी व अश्विनी या दोन मुली आहेत. परिस्थितीमुळे आई वडिलांना विशेष शिक्षण घेता आले नाही. याची त्यांना खंत होती. मात्र त्यांनी आपले स्वप्न सत्यात उतरण्याचे ठरवून आपल्या दोन्ही मुलींच्या उच्च शिक्षणाचा विडा उचलला. त्यांनी मुलीला चंद्रपूर येथे शिक्षणासाठी पाठवले.

अश्विनीने चंद्रपूरच्या गर्ल्स कॉलेज मधून 12 वी उत्तिर्ण केली. तिला बारावीत 79 टक्के गुण मिळाले तर नीट परीक्षेत तिने 720 पैकी 492 गुण मिळवले. तिला नांदेडच्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला आहे. अश्विनी आपल्या यशाचे श्रेय मोठी बहिण व आईवडिलांना देते. आईवडिलांकडून तिला नेहमी शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले तर मोठ्या बहिणीकडून तिला मार्गदर्शन मिळाले. अश्विनीची मोठी बहिण तेजस्वीनी ही देखील लातूर येथे एमबीबीएस करीत आहे. तर तिचा भाऊ हा नीट ची तयारी करीत आहे.

डॉक्टर आणि आशासेविकांद्वारे अश्विनीचा सत्कार
अश्विनीने मिळवलेल्या या यशाबद्दल शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे अश्विनी व तिची आई रेणूताई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनय कोहळे यांची प्रमुख उपस्थिती होती. एम. आर. पुनवटकर वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, कु. निता बदुकले वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सी.आर. वालदे तालुका कृष्ठरोग तंत्रज्ञ, एम. एस. पंधरे आरोग्य सहाय्यक शिरपूर, ए.बी.कोयरे आरोग्य सहाय्यक शिरपूर, सी.एल. दोडके औषध निर्माण अधिकारी शिरपूर, कु. रोशनी बागडे एल.एच. वि.गटप्रर्वतक तसेच आरोग्य केंद्रातील सर्व आशा स्वयंसेविकांची यावेळी उपस्थिती होती.

Comments are closed.