विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कोलगाव (साखरा) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. म्हणून सदर वैद्यकीय अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी तालुका वैद्यकीय अधिकारी वणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वणी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर हे आरोग्य केंद्र आहे. सदर आरोग्य केंद्रांतर्गत शिंदोला परिसरातील साधारणतः वीस गावे जोडलेले आहे. सदर रुग्णालय परिसरातील गावांच्या केंद्रस्थानी नसून एका टोकाला आहे. परिणामी या केंद्रात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमीच असते. सदर आरोग्य केंद्रातील सुविधांचा अभाव आणि वैद्यकीय अधिकारी यांचा कारभार वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
सदर आरोग्य अधिकारी रुग्ण तपासणीच्या वेळी अन्यत्र फेरफटका मारत असतात. त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागते. रुग्ण तपासणी करतांना रुग्णासोबत कामाव्यतिरिक्त चर्चा करतात. स्त्री रुग्णांसोबत असभ्य भाषेत बोलतात. गावात हस्तक्षेप करून गावात दुफळी माजविण्याचे काम करतात. गरजू रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध करून न देता स्वतःच्या खाजगी कामाकरिता रुग्णवाहिकेचा वापर करतात. असे आरोप करीत सदर आरोग्य अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनात केली आहे.