Exclusive: निधीअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांची अवस्था वाईट

आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या जिल्ह्यात पाण्याचा अपव्यय

0

निकेश जिलठे, वणी: शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळावं, गुराढोरांना पिण्यास पाणी मिळावं, भूजल पातळी वाढावी यासाठी खेड्यापाड्यातील नदी नाल्यावर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र शासनानं या बंधा-यांकडे दुर्लक्ष केल्यानं या बंधाऱ्यांची वाईट अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी बंधा-याचे बरगे (गेट) चोरीला गेले आहे. तर अनेक बंधा-याला दागडुजीची गरज आहे. मात्र निधीअभावी हे बंधारी कुचकामी ठरत असून परतीच्या पावसाचं पाणी अडवण्यात जिल्हा परिषद अपयशी ठरताना दिसत आहे.

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. खेड्यापाड्यात सिंचनाची सोय व्हावी यासाठी कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहे. एका कोल्हापुरी बंधा-यावर किमान 50 सहस्र घनमीटर पाणीसाठा केला जाऊ शकतो. यातून सुमारे 100 हेक्टरचं क्षेत्र सिंचनाखाली आणलं जाऊ शकते. बंधारे बांधण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करते. मात्र शासन त्याच्या देखभालीसाठी निधी देत नसल्यानं पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.

वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यात एकूण 36 कोल्हापुरी बंधारे आहेत. यातील वणी तालुक्यात 6, मारेगाव तालुक्यात 23 तर झरी तालुक्यात 7 बंधारे आहेत. वणी तालुक्यातील बंधा-याची सिंचन क्षमता ही 397 हेक्टरची आहे. तर मारेगाव आणि झरी तालुक्यातील बंधा-याची सिंचन क्षमता 288 आणि 175 हेक्टर इतकी आहे. वणीजवळील वागदरा इथला बंधारा हा तालुक्यातील सर्वाधिक सिंचन क्षमतेचा बंधारा मानला जातो. याची सिंचन क्षमता 80 ते 100 हेक्टरची आहे. या तिन्ही तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक बंधा-याचे बरगे चोरीला गेले आहेत. काही ठिकाणचे बरगे पाण्यामुळे सडले आहेत. तर काही देखभालीअभावी नादुरुस्त आहेत.

दुरुस्तीसाठी शासनाचा निधीच नाही
कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी शासनाच्या वतीनं जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. त्यातून लघु सिंचन विभागातर्फे कोल्हापुरी बंधारे बांधले जातात. मात्र त्याच्या दागडुजीचा खर्च दिला जात नाही. नवीन बरगे बसवणे, सडलेले बरगे काढणे इत्यादी कामांसाठी शासन निधी देत नाही. त्यामुळे मोठा खर्च करून बांधण्यात आलेल्या बंधा-यांचा कोणताही उपयोग होताना दिसत नाही

यासंबंधी लघुसंचन विभागाचे उपअभियंता मनोज देशपांडे यांना विचारणा केली असता, बंधा-यासाठी शासनाचा निधी येत नसल्यानं जलयुक्त शिवारातून मिळणा-या निधीतून बंधा-याचं काम करावं लागतं. निधी नसल्यानं बंधा-याची स्थिती वाईट आहे. त्यामुळे हे बंधारे ग्रामपंचायतीनं ताब्यात घ्यावे. बरगे चोरीला जाऊ नये यासाठी जनजागृती करावी. बंधा-याबाबत लोकांनी उदासिन न राहता गावात पाणी वापर संस्था स्थापन करावी. असं आवाहन त्यानी ग्रामस्थांना केलं आहेत. सोबतच नगरपालिकेनं हे बंधारे देखभालीसाठी ताब्यात घेतल्यास पालिका हद्दीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. यासंबंधी नगर पालिकेला पत्र दिल्याचंही त्यांनी सांगितले.

15 ऑक्टोबर नंतर वणी तालुक्यातील 2, मारेगाव तालुक्यातील 9 आणि झरी तालुक्यातील 3 आणि पांढरकवडा तालुक्यातील 4 बंधा-याला बरगे टाकण्यात येईल. अशी माहिती उप अभियंता पी डी मडावी यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या सिंचनाची सोय व्हावी म्हणून कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले. राज्यात तो एक पॅटर्नच तयार झाला होता. आजही शासन नवीन कोल्हापुरी बंधाऱ्याला परवानगी देते; पण जुन्याच्या दुरुस्तीसाठी निधी देत नाही. महत्त्वाचं म्हणजे या गंभीर प्रश्नांकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेलं नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध करून दिला, तर पाण्याचा अपव्यय होणार नाही आणि सिंचन होण्यास मदत होईल

यंदा पाऊस कमी झाल्यानं जानेवारी महिन्यापासूनच मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. शेतक-यांसाठी कोल्हापुरी बंधारे हे एक वरदान आहे. मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे या बंधा-यांची अवस्था वाईट झालेली आहे. शेतक-यांना दुष्काळाचा सामना करावा लागू नये यासाठी योग्य तो निधी देऊन बंधारे सुस्थितीत आणणे हे शासनाचं कर्तव्य आहे. जर या प्रश्नाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास योग्य ते पाऊल उचललं जाईल. सोबतच शेतक-यांनीही आगामी काळात येणारा दुष्काळ लक्षात घेऊन या बंधा-यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

– देवराव धांडे, ज्येष्ठ शेतकरी नेते

का पडलं कोल्हापुरी बंधारा नाव ?
सुप्रसिद्ध निसर्गकवी आणि शेतकरी ना. धो. महानोर यांनी राज्यातील शेतीला पाणी मिळावं यासाठी नदी, नाल्यावर छोटेखानी बंधाऱ्याची संकल्पना मांडली. तेव्हा काँग्रेस सरकारने या प्रस्तावाला मंजुरी देऊन सर्वप्रथम या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरात सुरू केली. कोल्हापुरात या प्रकल्पाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. गावोगावी बंधारे बांधल्या गेले. त्यामुळे या बंधाऱ्याची ओळख कोल्हापुरी बंधारा म्हणून नावारूपास आली. कालांतराने या योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त झालं. जलसंधारण योजनेतील महत्त्वाचा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प ओळखला जाऊ लागला.

लघुसिंचन विभागाच्या माध्यमातून राज्यभर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. पावसाळा संपल्यावर या बंधा-यावर बरगे बसवले जाते. शक्यतो ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात हे बंधा-याला बरगे लावले जाते. पावसाळा येण्याच्या आधी हे बरगे वर केले जाते किंवा काढले जाते. यामागचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास नदी नाल्याला पूर येऊ नये. मात्र पावसाळा संपला की बरगे लावून नदी नाल्यातील वाहणारं पाणी अडवलं जातं. यातून मोठ्या प्रमाणात सिंचन केलं जाऊ शकते. शिवाय शेतीला, गुराढोरांना आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.