बांधकाम साहित्य उचलायला गेलेल्या कर्मचा-यांना धक्काबुक्की

एकाविरोधात गुन्हा दाखल, बांधकाम साहित्यामुळे झाला होता रस्ता बंद

विवेक तोटेवार, वणी: वणीतील कोंडावर ले आऊट येथे रस्त्यावर बांधकामाचे साहित्य ठेऊन होते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करण्यास अडथळा होत होता. ही बाब नगर पालिका कर्मचा-यांना कळली. त्यामुळे ते कारवाई करण्यासाठी गेले. मात्र त्यांना एका शेजा-याने विरोध करत कर्मचाऱ्याला धक्काबुकी करीत शिवीगाळ केली. या प्रकरणी आरोपी शेजा-याविरोधात धक्काबुक्की करणा-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशपूर रोडवर कोंडावर ले आऊट आहे. इथे एका घरी बांधकाम सुरु होते. बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच पडलेले होते. त्यामुळे रस्ता बंद झाला होता. काही लोकांनी याची तक्रार नगर पालिकेकडे केली. या तक्रारीवरून वणी नगर पालिकेचे कर्मचारी भोलेश्वर नारायण ताराचंद (39) आरोग्य स्वच्छता निरीक्षक, रोहित दिलीप बिसमोरे (33), तरुण संतोष नारपांडे (25) हे 14 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता घटनास्थळी पोहचले.

सदर बांधकाम साहित्य मीनाक्षी खिरटकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर पडून होते. भोलेश्वर यांनी त्यांना सदर बांधकामाला कोणतीही परवानगी नसून बांधकामाचे साहित्य त्वरित उचलून न्यावे अशी सूचना केली. दरम्यान खिरटकर यांच्या शेजारी असेलेले किशोर मारोतराव गोहोकर (50) हे मध्ये आले. त्यांनी हे बांधकाम माझ्या मुलीचे असल्याचे सांगून त्यांनी बांधकाम साहित्य उचलू दिले नाही.

वाद वाढत असल्याने भोलेश्वर यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना बोलाविले. मुख्याधिकारी हे काही कर्मचारी व ट्रॅक्टर घेऊन आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना बांधकाम साहित्य उचलण्याचा आदेश दिला. यावेळी चेतन पन्नालाल चवरे हे साहित्य उचलण्यासाठी गेले असता या न.प. कर्मचाऱ्यांना किशोर यांनी धक्काबुकी केली व जीवे मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी भोलेश्वर यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात भादंविच्या कलम 353, 341, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.