विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने नगर परिषदेद्वारा जनावरे पकडणा-यांची एक टीम तयार करून त्यांना मोकाट जनावरे पकडण्याचा ठेका देण्यात आलाय. मात्र आता हे जनावरे पकडणारी टीम सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही टीम पैशासाठी घरासमोर बांधून असलेले जनावरे पकडून नेत असल्याच्या तक्रारी आता समोर येत आहे. एका व्यक्तीचे तब्बल सहा वेळा जनावर पकडून नेऊन त्यांच्याकडून सहा वेळा दंड वसुल करण्यात आला आहे.
वणीत मोकाट जनावरे कोंडवड्यात टाकून संबंधित जनावरांच्या मालकांकडून दंड घेतला जातो. दंड वसुल झाल्यानंतर जनावराला त्यांच्या मालकाच्या हवाली केले जाते. पण आता जनावरे पकडून नेणारे बळजबरी बांधून असलेले जनावरे नेत असल्याची तक्रार रविंद्र पालकर यांनी नगर पालिकेत केली आहे.
यांचे एकदा जनावर पकडून नेले. त्यानंतर त्यांनी दंड भरून ते जनावर सोडवून आणले. त्यानंतर त्यांचे जनावर पकडण्याचा जो सपाटा लावण्यात आला तो अद्यापही सुरूच आहे. एक दोन नव्हे तर चक्क सहा वेळा त्यांचे बांधून असलेलं जनावर नेले असल्याची तक्रार पालकर यांनी केली. एकदा 300 रुपये दंड भरल्यावर पुन्हा कुणी जनावरांना मोकाट सोडणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मोकाट जनावरे पकडून आणणाऱ्यास 50 रुपये दिले जाते. त्यामुळे पैशाच्या लालसेपोटी घरासमोर बांधलेली पाळीव जनावरेही पकडून नेले जात आहे अशी जनावर मालकांची तक्रार आहे.
कोंडवाड्यात टाकण्यात आलेल्या जनावरांना योग्य वागणूक दिली जात नाही अशी देखील तक्रार आहे. त्यांना मारहाणही करून त्यांची सोडवणूक न केल्यास त्या जनावरांना खाटकासही परस्पर विकण्यात येत असल्याची तक्रार नगर परिषदेकडे करण्यात आली आहे. अशा पाळीव जनावरांना कोंडवड्यात चारापाण्याचीही व्यवस्था नाही. तेव्हा इथल्या पाळीव जनावरास कोणतीही इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न आता जनतेकडून विचारल्या जात आहे.
वणीत डुकरांची संख्या मोट्या प्रमाणात वाढली आहे. या संख्येवर मात्र नगर परिषदेच्या नियंत्रण नाही. डुकरामुळे अनेकदा अपघातही झाले आहे. याबाबत अनेकांद्वारे निवेदनही देण्यात आले, पण डुकरांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. यावर नगर पालिका प्रशासनातर्फे कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही.